पो.डा. वार्ताहर , परभणी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची आदर्श आचारसंहिता मतदार संघात लागू झाली असून, उमेदवारांमार्फत नामनिर्देशन पत्रेही दाखल होणार आहे. त्याअनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक पथक प्रमुखाने उमेदवाराच्या दैनंदिन खर्चाचा अचूक हिशोब ठेवावा, असे निर्देश निवडणूक निरिक्षक (खर्च) अनुराग चंद्रा यांनी दिल्या.
भारत निवडणूक आयोगाने 17-परभणी लोकसभा मतदार संघासाठी भारतीय महसूल सेवेतील अधिकारी अनुराग चंद्रा यांची निवडणूक निरिक्षक (खर्च) म्हणुन नियुक्ती केली आहे. श्री. चंद्रा यांचे कालच परभणी येथे आगमन झाले. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात 17-परभणी लोकसभा मतदार संघातील निवडणूक खर्च विषयक कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक गणेश पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. चंद्रा म्हणाले की, लोकसभा निवडणूक ही निष्पक्ष व निर्भय वातावरणात मतदान पार पाडण्यासाठी सर्व पथकांनी समन्वयाने काम करावे. निवडणूक कालावधीत मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी कपडे, दारू तसेच पैशांची वाहतूक होण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने व्हीएसटी, व्हीव्हीटी आणि एसएसटी पथकांनी व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचेही त्यांनी निर्देश दिले. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होणारा प्रचार पाहता त्याबाबतीत खर्चाची नियमित माहिती प्रसार माध्यम कक्षाने उपलब्ध करून द्यावी. सर्व पथक प्रमुखांनी खर्चाच्या नोंदी अचूक घेऊन जिल्हास्तरीय निवडणूक खर्च नियंत्रण समितीला नियमीत अहवाल सादर करावा. लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयांनी कार्य करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
प्रारंभी श्री. चंद्रा यांनी सर्व पथक प्रमुखांचा परिचय करुन घेतला. तसेच विविध विषयांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिका-यांशी संवाद साधून पुर्वतयारीचा आढावा घेतला.
त्यानंतर श्री. चंद्रा यांनी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने स्थापित करण्यात आलेले प्रसार माध्यम कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्ष, नियंत्रण कक्ष, सी-विजील कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष, खर्च कक्षांना भेटी देवून कामकाजाची माहिती देत सूचना दिल्या.