पो. डा. प्रतिनिधी, वाशिम: राज्य शासनाचा ‘ शासन आपल्या दारी ’ या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत मंगरूळपीर तालुक्यातील 122 गावात हर घर दस्तक या अभियानाची सुरुवात नुकतीच करण्यात आली. या अभियानांतर्गत काटेपूर्णा अभयारण्याजवळ असलेल्या रुईया या गावात 12 कुटुंबापासून हर घर दस्तक अभियानाचा शुभारंभ झाला. रुईया हे गांव आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेले गाव असून गावाची लोकसंख्या 35 ते 40 इतकी आहे. या गावात तालुक्यातून पोहोच रस्ता नसल्याने अभयारण्यातील रस्त्याचा वापर करून या गावात जावे लागते. शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत रुईया या गावातील प्रत्येक घरी यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन विविध योजनांचे 50 प्रकारचे लाभ देण्यात आले.
महसूल विभागाच्या वतीने 12 उत्पन्नाचे दाखले, 8 मतदार नोंदणी, 3 संजय गांधी निराधार योजना, कृषी विभागातर्फे 14 बियाणे किट, 2 फळबाग योजना ग्रामपंचायतमार्फत, 12 जॉब कार्ड असे एकूण 51 विविध लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आले.
तसेच पंचायत समिती व नगरपरिषद यांच्या वतीने सुद्धा कर वसुली करण्यात आली. कर संग्रहाकरीता कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध प्रभागात भेटी देऊन नागरिकांना ज्या योजनांचा लाभ पाहिजे आहे त्या योजनांची माहिती संकलित करण्यात आली. तसेच शिवणी या गावीसुद्धा पंचायत समिती व बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी भेटी दिल्या. हा कार्यक्रम 18 जूनपर्यंत घेण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्वच गावात प्रत्येक घरी भेटी देऊन शासनाच्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची उद्दिष्ट कार्यवाही करण्यात येत आहे.
सर्व तलाठी, कृषीसेवक व ग्रामसेवक यांना गावे वाटप करण्यात आली असून त्यांना या कामी सहकार्य करण्याकरीता गावातील आशा वर्कर, रास्त भाव दुकानदार, पोलीस पाटील, ग्रामपंचायत शिपाई व कोतवाल यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनासुद्धा सामावून घेण्यात आले आहे.