अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत
पोलीस डायरी, प्रतिनिधी,बुलडाणा, : जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपूर्ती व इतर योजनांचे नवीन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन प्रणालीवर भरण्याची प्रक्रिया कार्यान्वित झाली आहे. विद्यार्थी व महाविद्यालयांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे.
आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ दिला जातो. ही योजना प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सर्व शासकिय निमशासकीय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयात राबविली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक सत्र 2023-24 साठी mahadbt.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ ऑक्टोबर 2023 पासून कार्यान्वित झाले आहे. त्यानुसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी सर्व दस्तऐवज जोडून महाविद्यालयास ऑनलाईन अर्ज करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी नवीन आणि नुतनीकरण अर्ज विहित मुदतीत अर्ज भरुन महाविद्यालय स्तरावर सादर करावेत. तसेच गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जांमधील त्रृटी पूर्ण करून प्रकल्प अधिकारी यांच्या लॉगीनला मंजुरीसाठी पाठविण्यात यावेत. तसेच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.