महासंस्कृती महोत्सवात रविवारी ‘ जेंव्हा रायगडाला जाग येते तेंव्हा ‘ नाट्य प्रयोग
ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री यांची उपस्थिती
सैराट फेम अभिनेत्री ‘रिंकू राजगुरू’ चीही उपस्थिती
पोलीस डायरी वार्ताहर, जळगाव दि. 2: महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित ‘ महासंस्कृती महोत्सव’ दिनांक 28 फेब्रुवारी पासून सुरु असून रविवारी दि.3 मार्च रोजी समारोप होणार आहे. समारोपाला नावाजलेले साहित्य संघ, मुंबई निर्मित व उपेंद्र दाते दिग्दर्शित ऐतिहासिक नाटक ‘ जेंव्हा रायगडाला जाग येते तेंव्हा ‘ सादर केले जाणार आहे. त्यापूर्वी ‘अवधेय-एक आदर्श ‘ ही नृत्य नाटिका होणार आहे. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत. सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू ची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे, लुप्त होत चाललेल्या कला-संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचावी या उद्देशाने जळगाव जिल्ह्यात 28 फेब्रुवारी हा महासांस्कृतिक महोत्सव सुरु आहे. पोवाडे, भारूड, किंकरी, वही वाचन, शिवकालीन मर्दानी खेळ, पारंपारिक लोक कला आणि नृत्य असे कार्यक्रम झाले.
जळगाव जिल्ह्यातील जनतेला खास करून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आरमार कसे होते हे कळावे म्हणून जळगाव येथील इतिहास अभ्यासक महेश माधवराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमार या वर प्रदर्शन भरविले आहे.