17 खेळांमध्ये 5 हजार महिलांनी घेतला सहभाग
पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आयोजित चला आठवणीच्या गावात या महिलांकरिता खेळांच्या क्रीडा उत्सवाला चंद्रपूरकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून यावेळी खेळल्या गेलेल्या 17 खेळांमध्ये जवळपास 5 हजार महिलांनी सहभाग घेतला. यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे वितरित करण्यात आले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सदर क्रिडा उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कल्याणी किशोर जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, तपस्या सराफ, सायली येरणे, माजी नगर सेविका सुनिता लोढीया, माता महाकाली सेवा समीतीचे सचिव अजय जयस्वाल, उज्वला नलगे, शाहिस्ता खान पठाण, डाॅ. जेबा निसार, सोनम खोब्रागडे, डाॅ. नियाज खान, डाॅ. अंजुम कुरेशी, सुचिता अगासे, वैशाली बदनोरे, सुरक्षा श्रिरामे, परविण पठाण आदींची प्रामूख्यतेने उपस्थिती होती.
महिलांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने चला आठवणीच्या गावात या पारंपारिक खेळांच्या क्रीडा उत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या आयोजनाचे दुसरे वर्ष होते. आमदार किशोर जोरगेवार यांनी उद्घाटन केल्या नंतर मौलाना अबुल कलाम आझाद बगीचा येथे दुपारी 4 वाजता सदर क्रीडा स्पर्धेला सुरवात झाली. यावेळी संगीत खुर्ची, फुगडी, मामाच पत्र हारवल, लिंबु चमचा, दोरीवरच्या उडी, लगोरी, तळ्यात – मळ्यात, बेडूक उडी, पोता उडी, दोन पायांची उडी, स्मरणशक्ती स्पर्धा, बटाटा शर्यत, रस्सीखेच, रांगोळी स्पर्धा, घागर स्पर्धा, पुजा थाळी सजावट स्पर्धा, पारंपारिक वेशभूषा स्पर्धा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धा 18 ते 30, 31 ते 45, 46 ते 60 आणी 60 वर्षांवरील अशा चार गटात पार पडल्या तर येणा-या प्रेक्षकांसाठी येथे टायर चालवणे, फुगा बंदुक, रिंग फेकणे हे खेळ आयोजित करण्यात आले होते. यावेळी वासवी क्विन महिला मंडळ, लक्ष्मी गृप कुणबी समाज, सहजयोग ज्ञान साधना केंद्र महिला शक्ती, महाकाली नारी शक्ती महिला मंडळ, आदिवासी हलबा जमात महिला मंडळ, ज्युपिटर बहु. संस्था, सर्वांगीण विकास बहु. शिक्षण प्रसारक मंडळ, लिंगायत समाज महिला मंडळ, घे भरारी महिला मंच, चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ, अल्पसंख्यांक महिला गृप, श्री स्वामी समर्थ महिला मंडळ, संस्कार परिवार माहेश्वरी महिला गृप, आदींनी सहकार्य केले.
छोट्या मुलांसाठी झुकझुक गाडी
छोट्या मुलांसाठी झुगझुग गाडी ठेवण्यात आली होती. लहान मुलांनी या गाडीचा आनंद घेतला. गाडी संपूर्ण बगिच्छा चा फेरफटका मारत होती. तर घोड सवारी ही येथे ठेवण्यात आली होती. याचाही चंद्रपूरकरांनी आनंद लुटला
बहिणींच्या चेहऱ्यावरचे आनंद हेच आमचे समाधान – आ. किशोर जोरगेवार
परिवार सांभळात असतांना महिलांचे स्वताकडे पुर्णताह दुर्लक्ष होते. त्यांना स्वतासाठी वेळ काढता येत नाही, स्वतासाठी जगता येत नाही. त्यामुळे एक दिवस महिलांनी स्वतःसाठी जगावं. आपल्या बालपणीचे दिवस आठवून मनसोक्त आनंद लुटावा यासाठी चला आठवणीच्या गावात ही संकल्पना आपण सुरु केली. आज येथे आलेल्या प्रत्येक बहिणीच्या चेह-यांवर चिंता नाही तर आनंद दिसतोय, कोणी जिंकलय यासाठी आनंदी आहे. तर कोणी पून्हा एकदा ते खेळ खेळता आले म्हणून आनंदी आहे. तुमचा हा आनंदच आमचे समाधान असुन या आयोजनाचे यश असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.