पो.डा. वार्ताहर : राज्यातील १२ कोटी जनतेला अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे गुणवत्तापूर्ण, जलद आणि सुलभ आरोग्यसेवा मिळणार आहे. यासंदर्भात स्वित्झर्लंडमधील #दावोस येथे ‘हिताची एमजीआरएम नेट’ या कंपनीबरोबर भागीदारी करण्यात आली असून त्यामुळे आरोग्य क्षेत्रात परिवर्तन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी व्यक्त केला.
‘एमएसटीएआर’ या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर दावोस येथे चर्चा केली. एमएसटीएआर हा एक नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्म असून आयुष्मान भारत डिजिटल मिशन अनुरूप डिजिटल आरोग्य सेवा राज्यातील जनतेला देण्याची सुविधा यामध्ये आहे. या भागीदारीमुळे राज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती होईल. नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा मिळेल. शिवाय प्रत्येकाचे आरोग्य रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यात येईल. रिमोट पद्धतीने वैद्यकीय चाचण्या व तपासणी करण्यात येतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट्य आहे.यामुळे या सेवा देण्याचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.