पो.डा. वार्ताहर , वाशिम : महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ अनुसूचित जातीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 17 मार्च 2022 व विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या 23 जून 2023 या शासन निर्णयानुसार देण्यात येतो.
शिष्यवृत्ती योजनेकरीता पात्र विद्यार्थ्यांच्या सन 2021-22 व 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी महाविद्यालयास देय असणारा भाग व विद्यार्थ्याला देय असणारा भाग या दोन्ही भागाच्या एकत्रित रकमेचा केंद्र हिस्सा 60 टक्के लाभाची प्रलंबित शिष्यवृत्ती रक्कम केंद्र शासनाच्या प्रणालीद्वारे विद्यार्थ्याने नोंदणीकृत केलेल्या अर्जानुसार विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट केंद्र शासनाच्या डीबीटी तत्वावर वितरित करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने केंद्र हिस्सा 60 टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यास अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता वजा करून महाविद्यालयास देय असलेली रक्कम विद्यार्थ्यांने 7 दिवसाच्या आत महाविद्यालयास जमा करणे नमुद केलेल्या शासन निर्णयानुसार आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी शासन निर्णयाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या मंजूर झालेल्या केंद्र हिस्सा 60 टक्के रकमेमधून विद्यार्थ्यांची देय असलेली रक्कम व महाविद्यालयास अनुज्ञेय असलेल्या रकमेचा सविस्तर तपशिल विद्यार्थ्यास उपलब्ध करून द्यावा.याव्यतिरिक्त शिष्यवृत्तीधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त शुल्क वसुल करण्यात येऊ नये.असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.