पो.डा. वार्ताहर : साहित्य अभिवाचन स्पर्धेच्या माध्यमातून रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव ही संस्था अभिवाचनाचे महत्व समाजात रुजवत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना संस्कार भारती सारखी कलेला समर्पित संस्था यथोचित साथ देत आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. महाराष्ट्रात या स्पर्धेचा विशेष लौकिक आहे . हा लौकिक असाच वृद्धिंगत व्हावा असे प्रतिपादन नागपूरचे ज्येष्ठ रंगकर्मी अनिल उपाख्य बापू चनाखेकर यांनी केले.
संस्कार भारती चंद्रपूर तर्फे लोकमान्य टिळक विद्यालय चंद्रपूर येथे पूज्य पुरूषोत्तम दारव्हेकर स्मृती साहित्य अभिवाचन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन केले होते. रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव यांचा मूळ उपक्रम असलेल्या या स्पर्धेची प्राथमिक फेरी चंद्रपूर केंद्रावर संस्कार भारती तर्फे करण्यात आले. या वेळी बाह्य परीक्षक म्हणून श्री अनिल चनाखेकर उपस्थित होते. स्थानिक परीक्षक या नात्याने रंगकर्मी सुशील सहारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कार भारती च्या अध्यक्ष सौ संध्या विरमलवार यांनी केले. यावेळी मंचावर संस्कार भारतीचे जिल्हा महामंत्री मंगेश देऊरकर उपस्थित होते.
या स्पर्धेत वर्षा कोल्हे आणि मनीषा रोडे यांनी सादर केलेल्या स्मशानातील सोनं या संहितेच्या अभिवाचनाला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला . सुर्यांश साहित्य मंच चंद्रपूर यांनी सादर केलेल्या प्रेम की द्वेष या संहितेच्या अभिवाचनाला द्वितीय क्रमांक तर युवा शहीद बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांनी सादर केलेल्या गणेश ते गौरी या संहितेच्या अभिवाचनास तृतीय क्रमांकाचा मान मिळाला. प्रथम क्रमांकाची मानकरी संहिता फेब्रुवारी महिन्यात चाळीसगाव येथे अंतिम फेरीत सादर होणार आहे.
उत्कृष्ट वाचिक अभिनय प्रथम पुरस्कार युवा शहीद बहुउद्देशीय संस्थेचे तुषार चहारे यांना तर सुर्यांश साहित्य मंचच्या वैशाली रामटेके यांना द्वितीय पुरस्कार देण्यात आला. परीक्षक श्री अनिल चनाखेकर आणि श्री सुशील सहारे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेच्या प्रारंभी संस्कार भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी संस्कार भारती ध्येय गीत गायले. संचालन साहित्य विधा प्रमुख जागृती फाटक यांनी केले. आभार संस्कार भारतीचे सचिव लिलेश बरदाळकर यांनी केले. यावेळी संस्कार भारती तर्फे ज्येष्ठ रंगकर्मी बापू चनाखेकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मातृशक्ती प्रमुख भावना हस्तक ,सुजित आकोटकर , प्राजक्ता उपरकर , पूनम झा , अपर्णा घरोटे , किरण पराते, स्वरूपा जोशी आदींनी अथक परिश्रम घेतले.