पो.डा. वार्ताहर,नागपूर : रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
ध्वजदिन निधी संकलनात नागरिकांनी जास्तीत-जास्त योगदान देत देशसेवेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्र्यांनी ध्वजदिन निधी संकलनासाठी स्वत:चे एक महिन्याचे वेतन देण्याची घोषणाही यावेळी केली.
‘हम करे राष्ट्र आराधना तन से, मन से, धन से, जीवन से’ या ब्रीदाप्रमाणे प्रत्येक भारतीयांनी आपल्या देशासाठी योगदान देण्याची गरज आहे. सीमेवर सैनिक देशरक्षणासाठी अहोरात्र तैनात असतात. देशाच्या प्रगतीतही सैनिकांचे योगदान महत्वाचे आहे. लष्कराच्या कल्याणासाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी देणारा ध्वजदिन निधी संकलनाचा उपक्रम अनेक वर्षांपासून राज्यात सुरू आहे. सैनिकांप्रती कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी ध्वजदिन निधी संकलनात योगदान देण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले.
भारत देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहे. संरक्षण साहित्याची खरेदी करणारा देश म्हणून असलेली भारताची ओळख आता संरक्षण साहित्याचा विक्रेता देश अशी झाली आहे. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे नुकतेच पंतप्रधानाच्या हस्ते सिंधुदुर्ग किल्यावर अनावरण करण्यात आले. जम्मू-काश्मिरमध्ये देशाच्या सीमेवर कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्याचे सौभाग्य आपणास लाभल्याचा उल्लेखही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केला.
ध्वजदिन निधी संकलनात देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त १८५ टक्के ध्वजदिन निधी संकलन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्याचा स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हा सन्मान स्वीकारला. ध्वजदिन निधी संकलनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, नागपूरच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव डॉ. नितीन राठोड आदी उपस्थित होते.