पो.डा. वार्ताहर, वाशिम : पूर्वी केवळ लिहिता व वाचता येणे म्हणजेच साक्षर.ही साक्षरतेची व्याख्या काळानुरूप बदलून गेली आहे.आता प्रौढ शिक्षणावरील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार यात बदल झाला आहे.नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 5326 निरक्षरांना आता लिहिता वाचता येण्यासोबतच पायाभूत डिजिटल साक्षर करण्यात येणार आहे,ते सुद्धा त्यांच्या सवडीने.
पंधरा वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींना संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास ध्येय्यानुसार सन 2030 पर्यंत सर्व तरुण,प्रौढ पुरुष आणि स्त्रिया यांना संख्याज्ञानाची माहिती होणार आहे. या निरक्षरांना पायाभूत साक्षर करून त्यांना वाचन व लेखन शिकून त्यांचे संख्याज्ञान विकसित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील निरक्षरांना नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत साक्षर करण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची सभा नुकतीच निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.या सभेला जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री.पुठवाड,शिक्षणाधिकारी राजेश शिंदे,जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी- योजना गजानन डाबेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी व सर्व गटशिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती.
श्री.घुगे म्हणाले,निरक्षरांना साक्षर करण्यासाठी मन लावून काम करण्याची आवश्यकता आहे. गावपातळीवर अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांची साक्षरता कार्यक्रमासाठी मदत घ्यावी. शिकविण्यासाठी आणि शिकणाऱ्याला प्रोत्साहन देण्यात यावे.असे ते म्हणाले.
श्री.डाबेराव म्हणाले,जिल्ह्यातील 835 शाळांमधून निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यात आले.1733 पर्यवेक्षक नेमून शिक्षकांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले.आठवी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी हा घरातील निरक्षर व्यक्तीला साक्षर करणार आहे. मुख्याध्यापक हे या कार्यक्रमाचे गाव पातळीवरचे नोडल अधिकारी आहेत. हा कार्यक्रम 31 मार्च 2027 राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
हा कार्यक्रम स्वयंसेवकाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमात सहभागी असलेल्या स्वयंसेवकांना कोणतेही वेतन किंवा मासिक मानधन दिले जाणार नाही.हे स्वयंसेवक इयत्ता 8 वी आणि त्यावरील शालेय विद्यार्थी असतील. स्वतःच्या कुटुंबातील अशिक्षित सदस्यांना शिक्षित होण्यासाठी ते मदत करणार आहे.
निरक्षरांना ऑनलाइन पद्धतीने शिकविले जाणार आहे.स्वयंसेवकांना प्रशिक्षण व कार्यशाळेतून मार्गदर्शन केले जाणार आहे.स्वयंसेवक हे निरक्षरांना टीव्ही,रेडिओ,मोबाईल व अन्य डिजिटल माध्यमातून शिकविणार आहे.
नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022 – 27 या कालावधीत राबविला जाणार आहे.साक्षरतेतील प्राधान्यक्रम लक्षगट हा वय वर्ष 15 ते 35 वयोगट असून त्यांना विविध बाबीतून साक्षर करण्याचे मुख्य लक्ष आहे. ” उल्हास ” अँपच्या माध्यमातून स्वयंसेवक व निरक्षरांची नोंदणी केली जाणार आहे.
जिल्ह्यातील कारंजा तालुका – 395, मालेगाव तालुका – 214, मंगरूळपीर तालुका – 469, मानोरा तालुका – 444, रिसोड तालुका – 283 आणि वाशिम तालुका -3521 अशा एकूण 5326 निरक्षरांना नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या माध्यमातून साक्षर करण्यात येणार आहे.