सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे
समृद्धी महामार्गाबाबत आढावा बैठक
पो.डा. वार्ताहर , वाशिम – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची वेगमर्यादा निश्चित केली आहे.संबंधित वाहनांसाठी त्यांचे लेन देखील निश्चित केले आहे. त्यामुळे वाहनांनी वेगमर्यादा पाळून आणि दिलेल्या लेनवरून मार्गक्रमण करताना चुकीने दुसऱ्या लेनवरून वाहन धावत असेल तर ही बाब संबंधित वाहन चालकांच्या निदर्शनास त्वरित आणून द्यावी.त्यामुळे समृद्धी महामार्गावर होणारे वाहनांचे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.
आज 6 डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील वारंगी टोल प्लाजा येथील सभागृहात समृद्धी महामार्ग बाबतचा आढावा आयोजित बैठकीत घेताना श्री.भुसे बोलत होते. यावेळी राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक – अभियांत्रिकी,सुधाकर मुरादे,मुख्य अभियंता मुंबई,साहेबराव सुरोशे, अमरावती येथील मुख्य अभियंता दीपक सोनटक्के, नागपूर येथील प्रकल्प संचालक अश्विनी घुगे, छत्रपती संभाजीनगर येथील प्रभारी प्रकल्प संचालक रामदास खलसे, छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता श्रीमती अन्सारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे व वाशिम येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता गजानन पळसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री भुसे पुढे म्हणाले, समृद्धी महामार्गावरून प्रवासी खाजगी बसेस धावत असतील तर वाहन चालकांची अल्कोहोल टेस्ट करावी.बस सुस्थितीत धावण्यायोग्य असल्याची खात्री करावी. कोणताही वाहन चालक मद्यप्राशन करून वाहन चालविणार नाही याची दक्षता घ्यावी. समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी ड्युटीवर असलेला संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी करावी. दोन्ही रस्त्याच्या मध्यभागी वाढलेले गवत काढून टाकावे. ही साफसफाई नियमित करण्यात यावी. या महामार्गावर वाहनातून वाळू,गिट्टी किंवा दगड पडलेले दिसल्यास तातडीने काढून टाकावे.समृद्धी महामार्ग कायम स्वच्छ राहील याकडे विशेष लक्ष द्यावे. अपघातामुळे ज्या ठिकाणचा भाग व डिव्हायडर क्षेत्रीग्रस्त झाले आहे ते तातडीने दुरुस्त करून व्यवस्थित करावे,असे ते यावेळी म्हणाले.
ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, त्या कॅमेराचे नियंत्रण जवळच्या टोल प्लाजावर किंवा कंट्रोल रूमवर द्यावे. या महामार्गाच्या बाजूचे सिमेंट व जाळीच्या फेनसिंग तसेच वृक्ष लागवडीचे काम तातडीने पूर्ण करावे, असे सांगून श्री भुसे पुढे म्हणाले, समृद्धी महामार्गावर काही ठिकाणी विशेष काम झाले आहे.त्याचे प्रतिबिंब महामार्गावरील इतरही ठिकाणी दिसले पाहिजे.टाकाऊ वस्तुपासून आकर्षक देखावे या महामार्गावर तयार करण्यात यावे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी काही ठिकाणी स्वच्छतागृहे व पिण्याचे पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. समृद्धीवर सुशोभीकरण व रस्ते स्वच्छ दिसतील याबाबत उपाययोजना कराव्यात असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.सुरोशे यांनी समृद्धी महामार्गावर मानकाप्रमाणे उभारण्यात आलेल्या उपाययोजनाबाबतची माहिती दिली. जागोजागी सूचनाफलक,चिन्ह फलक, रोड मार्किंग,डेलीनेटर्स,रिफ्लेक्टर, कॅटआईज,वेग मर्यादा फलक, माहिती फलक, मेटल क्रॅश बॅरियर्स तसेच सध्या सुरू असलेल्या 600 किमी लांबीच्या या महामार्गावर आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी 13 क्रेन 30 टन क्षमतेच्या,17 शीघ्र प्रतिसाद वाहने, 17 रुग्णवाहिका, समृद्धी महामार्गावरील जिल्ह्यात 108 क्रमांकाच्या 287 रुग्णवाहिका,13 महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्र, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत 141 सुरक्षा पथके,महामार्गावरील होणाऱ्या अपघाताची दखल देऊन प्रत्येक 10 ते 12 किमी अंतरावर दोन रम्बलिंग स्ट्रीप,संदेश फलके, सूचना प्रणाली, वाहनांच्या चालकांचे समुपदेशन, वाहनांची टायर तपासणी, वाहन चालकांची अल्कोहोलिक ब्रेथ टेस्ट, रंगीत झेंडे,ठिकठिकाणी पेंटिंग, शिल्पे, माहिती दर्शविणारे विजिटिंग कार्ड्स, माहितीपत्रके,स्टँडी फ्लेक्स आदि.अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विहित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, लेन शिस्त न पाळणे, दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करणे, वाहन अवैध ठिकाणी पार्किंग करणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, वाहन सुरक्षित न ठेवणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, सीट बेल्ट न वापरणे आणि वाहन चालक सतर्क नसणे ही प्रमुख कारणे समृद्धी महामार्गावरील अपघातास कारणीभूत असल्याची माहिती श्री सुरोशे यांनी सादरीकरणातून दिली.
सात प्रकारच्या विविध कारणामुळे 30 नोव्हेंबरपर्यंत 73 गंभीर प्रकारचे अपघात होऊन या अपघातात 142 जणांना आपले प्राण गमावले लागले.4 डिसेंबर 2023 पर्यंत 1489 विविध प्रकारचे अपघात या महामार्गावर झाले. त्या महामार्गावरून डिसेंबर 2022 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत 54 लक्ष 54 हजार 862 वाहने धावली. या वाहनांकडून 422 कोटी 9 लक्ष 79 हजार 399 रुपये टोल वसूल करून महसूल प्राप्त झाल्याची माहिती श्री.सुरोसे यांनी दिली.
या बैठकीला समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराचे प्रतिनिधी, देखभाल करणारे प्राधिकृत अभियंते व रोडवे कंपनीचे टोल इनचार्ज व वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते.