पो.डा. प्रतिनिधी
गावपातळीवर काम करणाऱ्या यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांची तालुकापातळीवर सभा घेवून गावातील विविध योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती द्यावी. लाभार्थ्यांना संबंधित योजनेचा लाभ ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून देण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन लाभार्थ्यांपर्यत पोहोचून त्यांचे परिपूर्ण अर्ज भरुन घ्यावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या तयारीचा आढावा घेतांना श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण, उपजिल्हाधिकारी तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी कैलास देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. षण्मुगराजन म्हणाले, जिल्हयातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या उपक्रमाअंतर्गत निर्धारीत वेळेत लाभ देण्यासाठी सुक्ष्म नियोजन करुन कार्यवाही करावी. तालुक्याच्या ठिकाणी तहसिलदार यांनी गावपातळीवर काम करणाऱ्या विविध यंत्रणेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची सभा घ्यावी. प्रत्येक कार्यालयात ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे बॅनर लावावे. त्यामुळे संबंधित कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरीकांना या उपक्रमाची माहिती मिळून या उपक्रमात सहभागी होता येईल. गावपातळीवर काम करणाऱ्या यंत्रणांनी या उपक्रमाची व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. 18 ते 25 जून दरम्यान मंडळनिहाय शिबीराचे आयोजन करावे. तत्पूर्वी 12 जूनपर्यंत सर्व लाभार्थ्यांपर्यंत यंत्रणांनी पोहोचावे. तालुकास्तरीय सभेमध्ये गावपातळीवर काम करणाऱ्या यंत्रणांना जनजागृती करण्यासोबतच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या सुचना द्याव्यात असे त्यांनी सांगितले.
गावपातळीवर किती लाभार्थ्यांपर्यंत यंत्रणांचे कर्मचारी पोहचतात याची माहिती द्यावी. गावातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत यंत्रणेचा कर्मचारी पोहचून त्याच्यासाठी असलेल्या योजनेची माहिती लाभार्थ्यांना देवून लाभार्थाला त्या योजनेचा लाभ मिळवून दयावा. गावपातळीवर या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी काम करावे. असे श्रीमती पंत यावेळी म्हणाल्या.
श्री. देवरे म्हणाले, जिल्ह्यात हा उपक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेची भमिका महत्वाची आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या उपक्रमातून लाभ देणे अपेक्षित आहे. यंत्रणांनी गुगल शीटमध्ये माहिती भरतांना चुका होणार नाही याची दक्षता घेण्याचे सांगितले.
सभेला जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, संजय जोल्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. चौधरी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय खंबायत, रेशीम विकास अधिकारी श्री. फाळके, जिल्हा रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अनिल कानफाडे यांचेसह सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगर पालिकांचे मुख्याधिकारी व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.