पो.डा. प्रतिनिधी
वाशिम, दि. 06 पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत साठविण्यासाठी जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून भूजल पुनर्भरणाची कामे यंत्रणांनी मोठया प्रमाणात करतांना जिल्हयातील विविध तलावात साठलेला गाळ शेतात टाकून शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी यंत्रणांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दयावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.
जलशक्ती अभियान, जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित सभेत घेतांना श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी अपूर्वा नानोटकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए.आर. वानखडे, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, उप कार्यकारी अभियंता आर.एम. गिनमिने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री. षण्मुगराजन म्हणाले, जलशक्ती अभियानात प्रस्तावित करण्यात आलेली व आराखडयात समावेश असलेली कामे पूर्ण करण्यात यावी. पाऊस पडण्याला काही दिवसच बाकी आहे. त्या आधी वृक्ष लागवडीची पुर्व तयारी करावी. ग्रामीण व शहरी भागात शोषखड्डयांची कामे मोठया प्रमाणात करावी. विंधन विहीरीच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात यावी. शासकीय व खाजगी इमारतीवर रेनवॉटर हार्व्हेस्टिंगची कामे प्राधान्याने घेवून ती पूर्ण करण्यात यावी. असे ते म्हणाले.
पावसाळयापूर्वी तलावातील जास्तीत जास्त गाळ शेतकऱ्यांना शेतात पसरविण्यास यंत्रणांनी प्रोत्साहन दयावे. असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, गावपातळीवर संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांना या अभियानाबाबत माहिती देवून गाळाचे महत्व पटवून दयावे. त्यामुळे शेतकरी मोठया संख्येने शेतात गाळ टाकण्यास तयार होतील. तसेच यंत्रणांनी शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्याचा आग्रह देखील करावा. ज्या गावातील शेतकऱ्यांनी गाळ काढण्याची मागणी केली आहे. परंतू अद्यापही ते काम सुरु झालेले नाही ते काम संबंधित यंत्रणांनी लवकरच पावसाळा सुरु होणार असल्याने हाती घ्यावे. असे त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानात जिल्हयातील 166 गावांची निवड करण्यात आल्याचे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, या गावांमध्ये जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे. कृषी विभागाने या अभियानातून निवडलेल्या गावातील शेतीचे चित्र बदलले पाहिजे तसेच शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता देखील वाढली पाहिजे यासाठी काम करावे. तसेच नाला खोलीकरणाची कामे देखील मोठया प्रमाणात करण्यात यावी. असे ते म्हणाले.
श्रीमती पंत म्हणाल्या, जिल्हयात ग्रामीण आणि शहरी भागात शासनाच्या तसेच सार्वजनिक इमारतीची संख्या मोठी आहे. या इमारतीवर पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या पाण्याचे संकलन करता यावे. तसेच हे पाणी भूगर्भात साठवता यावे यासाठी रेनवॉटर हार्व्हेस्टिंगची कामे व शोषखड्डयांची यंत्रणांनी हाती घ्यावी. वृक्ष लागवडीसाठी आतापासूनच खड्डे तयार करण्याची कामे यंत्रणांनी करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 5 शोषखड्डे तयार करावे. असे त्यांनी सांगितले.
सभेला विविध संबंधित यंत्रणाचे अधिकारी, सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगर पालिकांचे मुख्याधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती.