चंद्रपूर:
संयुक्त राष्ट्रसंघाने 3 जून हा जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्ताने आयएमएचे अध्यक्ष डॉ. कीर्ती साने, ज्येष्ठ इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर चे सदस्य आणि सायकलपटू डॉ. विलास मुळ्ये यांच्या नेतृत्वाखाली आयएमए चंद्रपूर आणि चांदा रायडर्स ग्रुपतर्फे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध व्यवसायातील 30 सायकल रायडर्सनी एकत्र येऊन मोहीम पूर्ण केली. तसेच जिल्हा न्यायालय आणि दंडाधिकारी यांची आयोजित केलेल्या रॅलीत उपस्थिती होती. या सायकल रॅलीचा प्रारंभ प्रियदर्शनी हॉल पासून ते घुग्गुस रोड ते नागाळ्यापर्यंत गेले आणि चंद्रपूरला परतले.
यावेळी उपस्थितांनी निरोगी शरीरासाठी आणि सुरक्षित वातावरणासाठी सायकलिंगला प्रोत्साहन दिले. सायकल हे एक साधे, परवडणारे, स्वच्छ आणि पर्यावरणास (Environment) अनुकूल टिकाऊ वाहतुकीचे साधन आहे. हीच बाब समोर ठेवून चंद्रपूर शहरात सायकल चालवण्याला प्रोत्साहन देण्यासाठी सायकल रॅली चे आयोजन केले आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीने पाहता सायकल चालवल्याने स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, काही कर्करोग, नैराश्य, मधुमेह, लठ्ठपणा आणि संधिवात यासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण होऊ शकते . त्यामुळे या दिनाचे औचित्य साधून आरोग्य व स्वच्छ सुंदर पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वच वयोगटातील नागरिकांनी जास्तीतजास्त प्रमाणात सायकलचा वापर करावा असे या माध्यमातून आयोजकांनी आवाहन केले आहे.
याप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूरचे सचिव डॉ. कल्पना गुलवाडे , उपाध्यक्षा डॉ. पल्लवी इंगळे, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. रुजुता मुंधडा, तसेच डॉ. आशिष गजभिये, डॉ. मनीषा वासाडे, डॉ. किरण जानवे, डॉ. संदीप मुनगंटीवार, डॉ. प्राजक्ता असवार, डॉ. रिजवान शिवजी, डॉ. अनुप पालीवाल, डॉ. गुरुराज कुलकर्णी व आयएमए संचालक मंडळ प्रामुख्याने उपस्थित होते.