जपानचे भारतातील राजदूत सुझुकी हिरोशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. जपान आणि महाराष्ट्राचे विविध क्षेत्रातील सहकार्य भारत -जपान सौहार्द संबंध आणखी दृढ करतील. त्यादृष्टीने जपानचे पर्यटन आणि कृषी क्षेत्रातील गुंतवणूक, उद्योगांचे महाराष्ट्रात स्वागतच असेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
भारत आणि जपानचे पूर्वापार चांगले संबंध आहेत. त्यातून दोन्ही देशाची अनेक क्षेत्रात उत्तम भागीदारी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे राज्य आहे. महाराष्ट्राकडे उद्योग आणि गुतंवणुकीची दृष्टीने मोठी क्षमता आहे. राज्यातील विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही पाठबळ मिळत असते. बुलेट ट्रेन प्रकल्पही आम्ही आता त्याच वेगाने गतिमान केले आहे.
जपानकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे. तर आमच्याकडे कुशल असे मनुष्यबळ आहे. त्यामुळे आपण एकत्र आलो तर खूप मोठा बदल घडवू शकतो. हे एमटीएचएल या भारतातील सर्वात लांबींच्या समुद्री सेतुचे उभारणीतून आपण दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील विविध औद्योगिक वसाहती आणि प्रकल्पांमध्ये जपानचे सहकार्य महत्वपूर्ण ठरू शकते. अशाच सहकार्यातून आपण मुंबई शहराला जगातील एक सर्वोत्तम शहर बनवू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
जपानचे राजदूत श्री. हिरोशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘स्ट्रॉंग लीडरशीप’ असा आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्रातही आम्हाला गुंतवणुकीच्या दृष्टीने मोठ्या संधी दृष्टीपथात आहेत. विशेषतः पर्यटन, वैद्यकीय क्षेत्र आणि कृषी या क्षेत्रातील आपल्याला एकत्र काम करता येईल. मुंबई आणि योकोहामा या ‘सिस्टर सिटीज्’ म्हणून या दोन्ही शहरांमध्ये आदानप्रदानही सुरु आहे. जपान-भारत संबंध आणि मुंबई-योकोहामा या दोन शहरांचे बंध दृढ व्हावेत यासाठी इन्डो-जपान सोसायटीच्यावतीने आगामी काळात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. एमटीएचएल हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प मुंबईचा कायापालट करणारा ठरेल, असा विश्वासही राजदूत सुझुकी हिरोशी यांनी व्यक्त केला.
जपानच्या भारतातील दूतावास मंत्री श्रीमती हुकुगो क्योको, श्रीमती होम्मा मायू, दूतावास सचिव उसामी कोईची, मुंबईतील वाणिज्यिक दूतावास प्रमुख फुकाहोरी यासुकाटा, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते.