पो. डा. प्रतिनिधी, सातारा : वेळेवर जेवण दिले नाही म्हणून वत्सला नामदेव बाबर (वय ७०) या वृद्ध आत्याचा भाच्यानेच निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना सातारा तालुक्यातील बसाप्पाचीवाडी येथे घडली.
या घटनेनंतर सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या दोन तासांत भाच्याच्या मुसक्या आवळल्या. हरिदास सुरेश चव्हाण (वय ३०,रा. बसाप्पाचीवाडी,ता. सातारा) असे त्याचे नाव आहे.
संशयित आरोपी हरिदास चव्हाण याच्या आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तो त्याची आत्या वत्सला बाबर यांच्याकडे राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. सोमवारी रात्री हरिदासने आत्याला जेवण मागितले. मात्र, त्याला वेळेवर जेवण न दिल्याने त्याने वत्सला बाबर यांना दांडक्याने बेदम मारहाण केली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर हरिदास हा तेथून पसार झाला. पोलिस पथकांनी अवघ्या दोन तासांत आरोपीला गावच्या परिसरातूनच अटक केली.
लहानाचे मोठे केले तिचाच जीव घेतला
आई-वडिलांच्या निधनानंतर हरिदास चव्हाण याला आत्या वत्सला बाबर यांनीच लहानाचे मोठे केले. त्यानेच अशाप्रकारे आत्याचा जीव घेतल्याने बसाप्पाचीवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हरिदास हा दिवसभर गावातून इकडून तिकडे फिरत असायचा. दुपारी तो घरी येईपर्यंत त्याची आत्या वत्सला या जेवण करत नव्हत्या. तो घरी आल्यानंतरच त्याच्यासोबत त्या जेवण करीत होत्या.