पो. डा. प्रतिनिधी, गडचिरोली : विरोधात आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना घरी जाऊन धमकी देणारे चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.बाजार समिती निवडणुकीदरम्यान खांडवे यांनी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी न्यायालयाने खांडवे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
चामोर्शी बाजार समिती निवडणुकीच्या मैदानात गण्यारपवार यांचा पॅनल होता. ते स्वत:ही उमेदवार होते. २० एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. त्याच पहाटे ठाण्यात बोलावून लाथाबुक्क्या व बुटाने मारहाण केल्याचा आरोप गण्यारपवार यांनी पोलीस निरीक्षक खांडवेंवर केला होता.
मारहाणीत गण्यारपवार यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. दरम्यान, पोलीस निरीक्षक खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासह बडतर्फीच्या कारवाईसाठी चामोर्शीत आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर गण्यारपवारांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.डी. मेश्राम यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत २० मे रोजी खांडवेंवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. दरम्यान, २५ मे रोजी सकाळी खांडवे हे न्या. मेश्राम यांच्या निवासस्थानी गेले. गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्यावरून खांडवे यांनी न्या. मेश्राम यांच्याशी हुज्जत घालून धमकावले. त्यानंतर खांडवे हे तेथून निघून गेले. यानंतर न्या. मेश्राम यांनी ही बाब पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना कळवली. चामोर्शी ठाण्याचा तात्पुरता पदभार उपनिरीक्षक सुधीर साठे यांच्याकडे सोपवला आहे.
पोलीस अधीक्षकांनी घेतली तत्काळ दखल
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी तातडीने स्वत: खातरजमा केली. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या. उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठांना ही बाब कळवली. त्यानंतर खांडवे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध चामोर्शी ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला.