पो. डा. प्रतिनिधी, धुळे – धुळे : येथील रहिवासी, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती यशवंत बागुल यांचा दोन अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून खून केल्याने खळबळ उडाली आहे.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे धुळे शहराध्यक्ष यशवंत बागुल यांचा दोन अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून तसेच चाकूने भोसकून निर्घूण खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले की, धुळे तालुक्यातील उभंड नांद्रे रस्त्यावर पिंपरखेडा घाटात गुरुवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास हा खून झाला. यशवंत सुरेश बागुल (वय ४४, रा. मिलिंद सोसायटी, साक्री रोड, धुळे) यांची धुळे तालुक्यातील उभंड नांद्रे शिवारात शेती आहे. शेतात डाळींब फळबाग आहे. डाळींब झाडाच्या फांद्यांना बांबू लावून सरळ उभे करण्याच्या कामासाठी उभंड नांद्रे गावात मजूर मिळत नसल्याने यशवंत बागुल त्यांची पत्नी आणि मुले मामांच्या घरी मुक्कामी थांबले होते. यशवंत बागुल हे त्यांच्या मामांचा मुलगा पंकज राजेंद्र मोहिते यांच्या मोटरसायकलवर बसून सायंकाळी सात वाजता शेजारच्या पिंपरखेडा गावात मजुरांच्या शोधासाठी गेले होते.
दोघेजण पिंपरखेड येथून उभंड नांद्रे गावाकडे परत येत असताना पिंपरखेड घाटामध्ये मोटरसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी ‘अण्णा थांब’ असा आवाज देऊन थांबविले. त्यानंतर यशवंत बागुल आणि ते दोघे अनोळखी इसम रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन गप्पा मारत उभे होते. काही वेळातच एकाने कमरेला लावलेले गावठी पिस्तूल काढले आणि गोळी झाडली. त्यामुळे यशवंत बागुल यांच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर दुसऱ्या इसमाने खिशातून चाकू काढून गळ्यावर, गळ्याच्या खाली छातीवर तसेच उजव्या हाताच्या काखेत चाकूने सपासप वार केले. हा भयावह प्रसंग पाहून यशवंत बागुल यांच्या मामाचा मुलगा पंकज मोहिते हा मोटरसायकलीने गावात निघून आला आणि घडलेली घटना त्याने घरी सांगितली. त्यानंतर सर्व नातेकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.
नातेवाईकांनी पोलिसांच्या मदतीने यशवंत बागुल यांना बेशुद्ध अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री एक वाजेच्या सुमाराला डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी यशवंत बागुल यांची पत्नी आशाबाई बागुल (वय 34 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०२ अन्वये खुनाचा आणि इतर कलमान्वये देखील गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, पोलीस मारेकर्यांचा शोध घेत आहेत. त्या अनोळखी इसमांना पाहिल्यास मी त्यांना ओळखेल असे पंकज मोहिते याने म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांना त्याची चांगलीच मदत होणार आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, गुन्हाचा तपास योग्य दिशेने सुरू असून मारेकरी लवकरच हाती लागतील.