पो. डा. जळगाव प्रतिनिधी: नद्यांना येणारा महापूराचा धोका टळेल अन् जलसिंचनही होईल, असे भन्नाट आणि उपयुक्त माॅडेल जळगाव जिल्ह्यातील एका सामान्य शेतकऱ्याने विकसित केलेल्या माॅडेलची चक्क पीएमओ कार्यालयाने दखल घेतली आहे. तसेच दूरध्वनीवरून मुलाखत घेऊन त्यांच्या माॅडेलची माहिती ‘मन की बात’ कार्यक्रमातून प्रसारीतही केली.
जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील डोंगरकोठरा येथील रहिवासी तथा महानिर्मिती वीज कंपनीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने जल पुनर्भरणाची संकल्पना सुचविणारे पत्र पीएमओला लिहिले होते. त्याची दखल घेत दिल्लीतील पीएमओ कार्यालयाने त्यांना संपर्क करून संकल्पना समजून घेतली.
डोंगरकोठरा येथील रहिवासी डॉ. पुरुषोत्तम इच्छाराम ठोंबरे हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते सध्या शेती करतात. तसेच ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम नियमित पाहतात. या दरम्यान त्यांनी भूजल पुनर्भरणाबाबत सुचविलेली संकल्पना पीएमओ कार्यालयाला मेलद्वारे कळविली. त्यात यश न आल्याने नंतर त्यांनी आपले माॅडेल आणि सविस्तर माहिती असलेला प्रस्ताव टपालाने (Indian Post) पाठविला. यानंतर काही दिवसांनी पीएमओ कार्यालयातून पुरुषोत्तम ठोंबरे यांना संपर्क करण्यात आला. जल पुनर्भरणाची त्यांची नेमकी संकल्पना काय आहे?, सिंचनासाठी त्याचा कसा लाभ होऊ शकतो? हे समजून घेण्यात आले. थेट देशाच्या प्रधानमंत्री कार्यालयातून आलेल्या कॉलमुळे शेतकरी ठोंबरे भारावून गेले.
प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याऺची पऺतप्रधान कार्यालयातून फोनवरुन मुलाखत घेण्यात आली आणि मन की बात या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आली.
डाॅ. पुरुषोत्तम ईच्छाराम ठोऺबरे यांनी पऺतप्रधान कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यांनी नदीच्या पाण्याचा उपयोग करून जमिनीतील पाण्याची पातळी कशी वाढविता येईल, असे दाखवून दिले. त्याबद्दल त्यांचा उपसरपऺच, ग्रामविकास अधिकारी तसेच सदस्य यांनी नागरी सत्कार केला.
अशी आहे संकल्पना
पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर अतिरिक्त पाणी नदीपात्रातून वाहून जाते. त्यामुळे भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून, हे वाहून जाणारे पाणी दोन्ही बाजूने ठिकठिकाणी नदीपात्रातून वरील भागात वळवावे. काही ठराविक अंतरानंतर वळवलेले पाणी पुन्हा नदीपात्रात सोडता येईल अशी व्यवस्था करावी. म्हणजे ते उताराच्या दिशेने खाली जमिनीत पाझरेल. परिणामी वाहून जाणारे पाणी वाया न जाता ते वळवलेल्या भागात जमिनीत जिरून भूजल पातळी वाढेल. अशी शेतकरी ठोंबरे यांची संकल्पना आहे.