लंडनच्या अव्हॉस्टिक चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास केले अभिवादन
लालबहादूर शास्त्रींचेही केले स्मरण
भारताचे सरन्यायधीश श्री धनंजय चंद्रचूड यांचीही उपस्थिती
पो. डा. वार्ताहर : महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा मंत्र जगाने आज स्वीकारला आहे, असे उदगार संस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज लंडन येथे काढले. आज गांधी जयंतीनिमित्त लंडन येथील अव्हॉस्टिक चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भगवान श्रीकृष्णाच्या भूमीत जन्मलेल्या आणि जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेने जगात सर्वत्र साजरी केली जाते; आपण सर्वच महात्मा गांधी यांच्या भूमीतून आलो आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. यावेळी बोलतांना ना.श्री मुनगंटीवार यांनी भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.लालबहादूर शास्त्री यांनाही जयंतीनिमित्त भावांजली अर्पण केली.
भारताचे सरन्यायाधीश न्यायामूर्ती श्री धनंजय चंद्रचूड, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे व संस्कृतीक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री विकास खारगे, कॅमेडेन च्या उमहापौर समता खातून, स्थानिक डेप्युटी हाय कमिशनर, ब्रिटीश संसदेतील खासदार वीरेंद्र शर्मा, स्थानिक सुरक्षा व लष्कर सल्लागार, स्थानिक भारतीय नागरिक मंडळाचे पदाधिकारी श्री. अल्पेश पटेल, श्री. सी. बी. पटेल, प्रसिद्ध लेखक अमीश पटेल, महाराष्ट्र पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकार श्री अमोल जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ना. श्री मुनगंटीवार यावेळी पुढे म्हणाले की,आज लंडन मध्ये महात्मा गांधींना अभिवादन करण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद वाटतो. महात्मा गांधी यांनी स्ववलंबनाचा मंत्र सर्व जगाला दिला. चरखा हे स्ववलंबानाचे माध्यम म्हणून त्यांनी समाजाला दिले ; मी भाग्यवान कार्यकर्ता आहे कारण ज्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातून 1930 ते 1948 या काळात वास्तव्यास राहून संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश महात्मा गांधी यांनी दिला त्या सेवाग्राम येथे पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली व जगातील सर्वात मोठा चरखा उभारण्याचे भाग्य मला प्राप्त झाले. अहिंसेचे आयुध म्हणून त्यांनी चरख्याचा उपयोग केला. प्रेमाचा संदेश देत “ज्योत से ज्योत” जलाते रहो या भावनेने त्यांनी “जियो और जिने दो” ही भावना प्रत्येकात रुजविण्याचा जीवनभर प्रयत्न केला. लंडन येथे महात्मा गांधी यांच्या जयंती कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो असेही ते म्हणाले.
चौकट:
भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.लालबहादूर शास्त्री यांचीही आज जयंती असते. ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे आवर्जून स्मरण आपल्या भाषणात केले. भारताला स्वावलंबी बनविणाऱ्या, जय जवान जय किसान अशी घोषणा देऊन कृषी क्रांतीला चालना देणाऱ्या स्व.लालबहादूर शास्त्रींचेही आजच्या जयंतीदिनी स्मरण केलेच पाहिजे, ते आपले कर्तव्यच आहे.