दिव्यांगांची सेवा हीच ईश्वराची सेवा: आमदार बच्चू कडू
पोलीस डायरी प्रतिनिधी: वाशीम
जिल्हास्तरीय दिव्यांग मेळावा
· दिव्यांगांना प्रातिनिधिक स्वरुपात साहित्य व धनादेश वाटप
· दिव्यांगांसाठीच्या योजनांच्या पुस्तकाचे प्रकाशन
· विविध विभागांचे 40 स्टॉल्स
: दिव्यांगांच्या कल्याणासाठी तयार करण्यात आलेले जगातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात आहे. दिव्यांगांच्या हितासाठी राज्य शासनाने आतापर्यंत 82 शासन निर्णय काढले. दिव्यांग बांधव विविध प्रकारच्या दिव्यांगत्वावर मात करुन आत्मविश्वासाने जगत आहे. दिव्यांगांचे दुख: मोठे आहे. दिव्यांगांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. त्यांची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळाल्याचे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक आमदार श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.
आज 4 ऑक्टोबर रोजी वाशिम येथील रिसोड मार्गावरील तिरुपती लॉन येथे दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय दिव्यांग मेळाव्याचे उदघाटक म्हूणन श्री. बच्चू कडू बोलत होते. यावेळी आमदार ॲड. किरणराव सरनाईक, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती अशोक डोंगरदिवे, अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती वैभव सरनाईक, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, जिल्हा परिषद सदस्य सर्वश्री पांडुरंग ठाकरे, दौलतराव इंगोले, मिनाक्षी पट्टेबहादूर, शोभा शेगोकार, अर्चना मोरणे, अश्विनी तहकिक, लक्ष्मी तायडे, सरस्वती चौधरी, सुनिता कोठाडे, सुमित्रा भुजाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, अपर पोलीस अधिक्षक भारत तांगडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगांबर लोखंडे यांची मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
श्री. कडू म्हणाले, दिव्यांगांसाठी असलेला निधी ग्रामपंचायतींनी सन्मानाने दिव्यांगासाठी खर्च केला पाहिजे. राज्यातील सर्वच जिल्हयात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या अभियानाअंतर्गत दिव्यांग मेळावे घेण्यात येत आहे. मेळाव्याच्या माध्यमातून दिव्यांगांना विविध साहित्य व धनादेशाचे वाटप करण्यात येत आहे. त्यांच्याशी संवाद होत असल्याने त्यांच्या प्रश्नांची माहिती होत आहे. राज्यातील सर्व मेळावे झाल्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी धोरण ठरविण्यात येईल. केवळ त्यांच्यासाठी मंत्रालय सुरु करुन चालणार नाही तर त्यांच्यासाठी धोरण ठरविणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले.
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांगासाठी शिबीराचे आयोजन करण्यात यावे. असे सांगून आमदार श्री. कडू पुढे म्हणाले, कोणताही दिव्यांग व्यक्ती हा युडीआयडी कार्डपासून वंचित राहू नये. त्याला दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र यासह त्याला आवश्यक असलेल्या विविध योजनेचा लाभ सहज मिळाला पाहिजे. वाशिम जिल्हा परिषदेने दिव्यांगासाठी निधी खर्च केला आहे. दिव्यांग बांधवांनी एकत्र येवून बचतगट तयार करावे. त्यामधून त्यांनी उद्योगाची सुरुवात करावी. दिव्यांग व्यक्ती आत्मविश्वासाने जगत असल्यामुळे दिव्यांगाने अत्महत्या केल्याचे आजपर्यंत आपण ऐकले नसल्याचे श्री. कडू यावेळी म्हणाले.
आमदार ॲड. सरनाईक म्हणाले, दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरु झाले ते केवळ आमदार बच्चू कडू यांच्यामुळे. दिव्यांगांच्या कल्याणासाठी हे मंत्रालय महत्वाचे ठरणार आहे. दिव्यांगांच्या समस्या व त्यांच्या अडीअडचणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोडविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मान्यवरांच्या हस्ते नागेश साखरकर, रामदास हरीणकर या दिव्यांगांना व्हिलचेअर, अपंग-अव्यंग विवाह करणाऱ्या सचिन चव्हाण व सुषमा राठोड, लक्ष्मण भालेराव व संध्या ठाकरे या जोडप्यांना प्रत्येकी 24 हजार रुपयांचा धनादेश, बीज भांडवल योजनेच्या पुजा खिराडे व नसुकुल्ला खा नुरखॉ या दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रत्येकी 30 हजार रुपयांचा धनादेश, इलेक्ट्रीक सायकल खरेदीसाठी राधिका घुगे व उत्तम कांबळे यांना प्रत्येकी 40 हजार रुपयांचा धनादेश, जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत प्रज्ञा सरकटे व ऋतुजा आडे या मुलींना प्रोत्साहन भत्ता, दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून व्यवसायाकरीता गौतम चुमळे यांना 4 लक्ष रुपये व स्वप्नील टेंभरे याला 1 लक्ष रुपये कर्जाचे धनादेश देण्यात आले. आरोग्य विभागाकडून अनुसया वाळले, गुलाबराव मनवर व द्रौपद्राबाई हजारे या दिव्यांगांना आयुष्मान कार्डचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या अभियानाअंतर्गत आयोजित दिव्यांग मेळाव्यात दिव्यांग नोंदणी कक्षात अस्थिव्यंग, मतिमंद, मुकबधिर, अंध, इतर, दिव्यांग, झेरॉक्स व फोटोग्राफ, तक्रार निवारण व माहिती कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्टॉलवर अन्न पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना, सेतू विभाग आधार केंद्र, मतदार नोंदणी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचा युडीआयडी कार्ड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातून कृत्रिम अवयव, नगर पालिकेचा जन्म-मृत्यू/विवाह नोंदणी व इतर, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व दिव्यांग कल्याण विभाग, समग्र शिक्षा अभियान, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा आवास योजना व इतर योजना, महिला बचतगट वस्तू स्टॉल, सहायक आयुक्त, समाज कल्याण, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महात्मा फुले मागास विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळ यांचा प्रदर्शन व विक्री स्टॉल, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, जिल्हा अग्रणी बँक आणि जिल्हा उद्योग केंद्र यांचे माहिती देणारे स्टॉल या मेळाव्यात लावण्यात आले. जिल्हयातून मेळाव्यासाठी आलेल्या दिव्यांगांनी स्टॉलला भेट देवून संबंधित विभागाच्या तसेच महामंडळाच्या योजनांची माहिती जाणून घेतली. काही दिव्यांगांनी स्टॉलवरच अर्ज भरुन दिले.
प्रारंभी चेतन सेवांकुर, केकतउमरा ग्रुपच्या सदस्यांनी महाराष्ट्र गीत सुरेख आवाजात गाऊन उपस्थितांकडून प्रशंसा मिळविली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांसाठी विविध योजनांची माहिती असलेल्या दिव्यांग मार्गदर्शिका या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
दिव्यांग मेळाव्याला जिल्हयातून आलेले हजारो दिव्यांग बांधव व त्यांचे नातेवाईक पुर्णवेळ उपस्थित होते. मंचावरील मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी सभागृहात उपस्थित दिव्यांग बांधवांकडे पोहचले व प्रत्येकांची समस्या त्यांनी जाणून घेतले. तसेच त्यांचे निवेदन देखील स्विकारली. प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले. मेळाव्याचे संचालन व उपस्थितांचे आभार क्षिप्रा मानकर यांनी मानले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, नागरीक देखील मोठया संख्येने उपस्थित होते.