वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
राजुरा येथे कृषी सेवक भरती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीर
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : आपल्याकडे किती खाणी आहेत, किती नवीन उद्योग आले, हे चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रगतीचे मापदंड आहेतच. पण, चंद्रपूरमध्ये किती गुणवान विद्यार्थी आहेत, हा देखील प्रगत जिल्ह्याचा अत्यंत महत्त्वाचा निकष ठरतो. त्यामुळे अधिकाधिक गुणसंपन्न विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा राजुरा जनसंपर्क कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरा येथे मोफत कृषी सेवक भरती तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार, तालुका अध्यक्ष सुनील उरकुडे, अरुण मस्की, सतीश धोटे, साईनाथ मस्टे, उपविभागीय कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी, दिलीप वांढरे, वाघुजी गेडाम, लक्ष्मीकांत मासिरकर, किशोर कुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बिहार आणि महाराष्ट्रातील आयएएस, आयएफएसच्या तुलनात्मक टक्केवारीवर बोलताना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘२००७ मध्ये मी विधानसभेत आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएसचा टक्का महाराष्ट्रात कमी असल्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर समितीदेखील गठीत झाली होती. महाराष्ट्रातील परीक्षार्थीचे या परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अत्यल्प होते. आपण ज्याला मागास राज्य समजतो अशा बिहारमधून या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांची संख्या खूप आहे. मग आपल्याकडे ही संख्या कमी का, असा प्रश्न होता. त्यावर बिहारमधील तज्ज्ञांशी आम्ही चर्चा केली. बिहारमधील शिक्षण पद्धतीने योग्य नसल्याची चर्चा आम्ही ऐकतो. मग असे कसे घडते, असा प्रश्न त्यांना केला. तेव्हा त्यांनी सांगितले होते की, आमच्याकडे एखाद्या घरी मुलगा जन्माला आला, की भविष्यात तो पंतप्रधान, मुख्यमंत्री होईल, असे स्वप्न वडील बघतात. पण यापैकी काहीही होऊ शकत नाही, असे जेव्हा लक्षात येते तेव्हा मुलगा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट (जिल्हाधिकारी) होईल असे स्वप्न वडील बघतात. याचाच अर्थ जो मोठी स्वप्न बघतो तोच यशस्वी होतो. आपल्या संकल्पांना प्रयत्नांच्या पराकाष्टेची जोड देणाराच यशस्वी होत असतो. आणि त्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती लागते.’ मार्गदर्शन शिबिरातून हे नक्कीच साध्य होईल, असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
तर यश हमखास
बालकाला जन्म देणाऱ्या आईप्रमाणे इच्छाशक्ती असायला हवी. कारण आईच्या हातून तान्ह लेकरू कधीच खाली पडत नाही. आईच्या अंतर्मनात तिचं बाळ असतं. आपण ठरविलेले लक्ष्य अंतर्मनात पोहचविले तर यश हमखास आहे. तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले.