पो.डा. वार्ताहर , वाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ” शासन आपल्या दारी ” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम. या उपक्रमाच्या माध्यमातून गतिमान शासनाची प्रचिती नागरिकांना व लाभार्थ्यांना येत आहे.शासनाच्या विविध योजनांची केवळ माहितीच नाही तर योजनांचा लाभ घेऊन शासकीय यंत्रणा या उपक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या दारी पोहोचत आहे. कोणताही पात्र लाभार्थी हा आपल्या विभागाच्या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी शासकीय यंत्रणा जीव ओतून काम करताना दिसत आहे.कारंजा तालुक्यातील 8 महसूल मंडळाच्या ठिकाणी त्या मंडळाच्या कार्यक्षेत्रातील गावांसाठी जून व जुलै 2023 या महिन्यात घेण्यात आलेल्या शिबिरातून 49 हजार 300 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळाल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंद व समाधान व्यक्त होत आहे.
शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत.अनेकदा लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळत नसल्यामुळे त्यांना योजनांच्या लाभांपासून वंचित राहावे लागते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ” शासन आपल्या दारी ” या उपक्रमातून शासकीय यंत्रणाच थेट लाभार्थ्यांच्या दारी जाऊन विविध योजनांची माहिती देऊन त्यांना कोणत्या योजनांचा लाभ पाहिजे आहे ही माहिती तर घेत आहेच सोबतच योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या दारी जाऊन देत असल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गतिमान सरकार विषयी आनंद व समाधान व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील कारंजा हा मोठा तालुका.या तालुक्यातील अनेक गावातील लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वारंवार तालुका ठिकाणी येण्यासाठी वेळ व पैसा खर्च करावा लागतो.मात्र ” शासन आपल्या दारी ” या उपक्रमाच्या माध्यमातून मंडळ स्थळावर आयोजित शिबिरात लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ तर दिलाच सोबत त्यांना विविध शासकीय कामांसाठी लागणारे दाखले व प्रमाणपत्रेसुद्धा देण्यात आली. कारंजा तालुक्यात असलेल्या 8 महसूल मंडळात ” शासन आपल्या दारी ” हा उपक्रम राबविण्यात आल्याने 49 हजार 300 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. हा लाभ वस्तू, साहित्य, प्रमाणपत्र व दाखले स्वरूपात देण्यात आला.
कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे तहसीलदार कुणाल झाल्टे,पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी श्री. पडघान व कारंजा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.मोरे यांच्या नेतृत्वात ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या 38,श्रावणबाळ वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचा 80, एक खिडकी योजनेच्या माध्यमातून 10 हजार 462 लाभार्थ्यांना उत्पन्न, नॉन क्रिमिलियर, अधिवास व जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये राहत्या घरांची पडझड झाल्याने 17 कुटुंबांना अनुदान वितरित करण्यात आले. पूरात वाहून मयत झालेल्या चार व्यक्तींच्या वारसांना देखील अनुदान देण्यात आले.नैसर्गिक आपत्तीत वीज पडून एक म्हैस मृत पावल्याने म्हशीचे अनुदान देखील म्हशीच्या मालकाला वितरीत करण्यात आले.तर अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे नुकसानग्रस्त 31 हजार 610 शेतकऱ्यांना देखील या शिबिरातून अनुदानाचे वितरण करण्यात आले.
पुरवठा विभागाच्या माध्यमातून 233 नवीन शिधापत्रिकांचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले.160 लाभार्थ्यांना दुय्यम शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या.287 शिधापत्रिकेमध्ये नाव कमी किंवा वाढविण्यात आले. तर अभिलेख कक्षाकडून 4 हजार 155 सातबारा अभिलेख वितरित करण्यात आले.50 जणांना हक्क नोंदणी अभिलेख वितरित करण्यात आले.
1237 व्यक्तींना कोतवाल बुक नक्कल अभिलेख वितरित केली. 172 शेतकऱ्यांना पेरेपत्रक या कार्यक्रमातून दिले.तर 785 शेतकऱ्यांना फेरफार अभिलेख वितरित करण्यात आले. सलोखा योजनेअंतर्गत सात अंमल फेरफार यावेळी देण्यात आले.अशा एकूण 49 हजार 300 लाभार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून लाभाचे वितरण करण्यात आले.
कारंजा येथे तालुकास्तरावर आयोजित शिबिरात 19 हजार 300, पोहा मंडळ शिबिरात 4352, येवता मंडळात 4050, धनज मंडळात 4780, कामरगाव मंडळात 6221, उंबर्डा बाजार मंडळात 3750, हिवरा (लाहे) मंडळात 3322 आणि खेर्डा (बुद्रुक) मंडळात 3525 लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.