पो.डा. वार्ताहर रत्नागिरी :- राज्य परिवहन महामंडळाच्या प्रचलित कार्यपध्दतीने रत्नागिरी विभागातील सर्व बसेसची देखभाल दुरुस्ती, स्वच्छता पूर्ण क्षमतेने करण्यात येते. महामंडळाच्या अभियांत्रिकी खात्याकडील पंचसूत्री तत्वानुसार कार्यपध्दतीचा अवलंब व परिक्षण करुनच प्रत्येक बस मार्गावर प्रवासी वाहतुकीकरिता वापरण्यात येते. प्रवाशांना सुखकर व सुरक्षित सेवा देण्यासाठी राज्य परिवहन रत्नागिरी विभाग व राज्य परिवहन महामंडळ सदैव कटिबध्द राहील. प्रवाशांनी आणि विविध समाज घटकांनी तसेच प्रसार माध्यमांनी महामंडळाच्या कार्यपध्दतीवर विश्वास ठेवून कोणतीही भीती किंवा शंका न बाळगता राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन विभाग नियंत्रक पी. एस बोरसे यांनी केले आहे.
राज्य परिवहन महामंडळ देवरुख आगाराचे चालक अमित सुधाकर आपटे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःचे व्हिडीओ तयार केले. या व्हिडीओमध्ये प्रवासी जनतेला थेट प्रवास करु नये. आपला जीव वाचवा, असे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने विभागीय पातळीवर तातडीने चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच संबंधित एकूण जबाबदार सर्व कर्मचाऱ्यांवर खातेनिहाय कारवाई करण्यात येईल, असा खुलासाही विभाग नियंत्रक श्री. बोरसे यांनी केला आहे.