पो.डा. वार्ताहर , वाशिम : जिल्हयात एकूण 1 लक्ष 68 हजार 91 गोवर्गीय पशुधन आहे. आजपर्यंत 1 लक्ष 59 हजार 404 जनावरांचे लम्पी चर्मरोग प्रतिबंध लसीकरण पुर्ण झाले आहे. तरी देखील वाशिम तालुक्यात 4, मालेगांव तालुक्यात 1, मंगरुळपीर तालुक्यात 1 व रिसोड तालुक्यात 1 असे एकूण 7 गोवंशीय जनावरांचा या लम्पी रोगामुळे मृत्यू झाला आहे. याकरीता पशुसंवर्धन विभागाकडून या रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे.
जनावरांना या आजाराची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी त्वरीत संपर्क साधावा. बाधित जनावरे कळपातील निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावी. त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था देखील वेगळी करण्यात यावी. बाधित जनावरांची वाहतूक करु नये. बाधित जनावरांवर वेळीच औषधोपचार करण्यात यावे. बाधित व निरोगी जनावरे एकत्रित चरावयास सोडू नये. मृत जनावरांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावावी. या रोगाचा प्रसार हा मुख्यत्वे बाहय किटकाव्दारे होत असल्याने जनावरांचे गोठे व त्यालगतचा परिसर येथील मच्छर, गोचिडे व माश्यांचे निर्मुलन करण्यासाठी जंतनाशक औषधांची फवारणी करुन घ्यावी व जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावे. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय गोरे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरुण यादगीरे यांनी केले आहे.