एक विवाह असाही…..
तृतीयपंथी शिवलक्ष्मीचे टीकाकारांना कृतीतून दिले उत्तर…
पो. डा. वार्ताहर,
नाशिक
नाशिक/ मनमाड येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या एक वेगळ्या विवाहाची चर्चा देशभर रंगली होती,तो
तो विवाह सोहळा म्हणजे नाशिक जिल्ह्यातील येवल्याच्या संजय झाल्टे आणि मनमाडच्या
शिवलक्ष्मी यांचा. येवल्यात रहाणारे संजय झाल्टे आणि तृतीयपंथी शिवलक्ष्मी यांच्यात सोशल मेडियाच्या माध्यमातून प्रेमसंबंध निर्माण झाले आणि कुटुंबियांच्या उपस्थित ते विवाह बंधनात बांधले गेलेत. एक तृतीयपंथी म्हणून शिवलक्ष्मी काय संसार करणार म्हणून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती, मात्र संजय झाल्टे आणि शिवलक्ष्मी यांच्या लग्नाला पाहता पाहता 2 वर्षे पूर्ण झाली असून त्यांचा संसार सर्वसामान्य जोडप्या प्रमाणे गुण्यागोविंदाने सुरू आहे.
संसार सुखाचा आमचा, प्रेमाने, सहयोगाने तरुण नेऊ, टीकाकारांना कृतीतून निरुत्तर करू : शिवलक्ष्मी झाल्टे
जेव्हा एखादी सून माप ओलांडून घरात येते तेव्हा तिने सुखी संसाराची अनेक स्वप्न बघितलेली असतात आणि मी ही सर्व स्वप्न संजय सोबत बघतलेली आहेत आणि ती सर्व स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. यात माझे सासू, सासरे, दिर, नणंद, जाऊबाई यांचं सर्वांचं सहकार्य आणि प्रेम मिळालं आहे. आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांच्या सोबत राहून संसार करायचा आहे. ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यांना आम्ही आमच्या सुखी संसार करून कृतीतून उत्तर देणार आहोत, अशी प्रतिक्रिया शिवलक्ष्मी झाल्टे यांनी दिली आहे.
शेवट पर्यंत एकत्र राहू: संजय झाल्टे
मी तृतीयपंथीय सोबत विवाह केला, तेव्हा अनेकांनी नावं ठेवलित, हा संसार चार महिने टिकणार नाही असे अनेक जण बोलत होते. आज आम्ही गुण्यागोविंदाने संसार करत असून आमच्या विवाहाला 2 वर्षे पूर्ण झाली आहे. एका यशस्वी नात्यात – सुख, समाधान, सहकार्य गरजेचे असते, तर हे सहजीवन सुलभ होते. मला आणि शिवलक्ष्मीला समाजाला एक दाखवून द्यायचं आहे आम्ही एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं आहे,आम्ही एकमेकांना समजून घेतो, शिवलक्ष्मीच्या रूपाने मला समजून घेणारी जोडीदार मिळाली आहे,
आम्ही शेवटपर्यंत सोबत राहण्यासाठी हे लग्न केलं आहे, अशी प्रतिक्रिया संजय झाल्टे यांनी दिली.