पो. डा. वार्ताहर : कौशल्य केंद्र आपल्या दारी या संकल्पनेतून नागपूर विभागातील नामांकित उद्योग, उद्योजक संघटना, मोठे कामगार कंत्राटदार यांच्यासोबत सामंजस्य करार करण्याकरिता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत 17 सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘इंडस्ट्री मिट’चे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हयातील विविध उद्योजकांना आवश्यक ते कुशल, अकुशल मनुष्यबळ प्राप्त होणे, उद्योग, आस्थापनांकरिता मनुष्यबळाच्या मागणीची मोफत जाहिरात प्रसिध्द करणे, उद्योजकांना रोजगार प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळवून देणे, उमेदवारांना रोजगार प्राप्त करणे सोईस्कर होणे तसेच शासन आणि उद्योग समूह यांच्यात सामंजस्य, समन्वय साधणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.
महाराष्ट्रातील बेरोजगार तरूणांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच उद्योगांना आवश्यक कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याकरिता नागपूर विभागातील सर्व नामांकित उद्योजक, इंडस्ट्री असोसिएशन, प्लेसमेंट एजन्सीज, मोठमोठे हॉटेल्स व हॉस्पिटल्स, मॉल्स आदींनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित ‘इंडस्ट्री मिट’ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन शासनासोबत जास्तीत जास्त संख्येने सामंजस्य करार करून घेत संधीचा लाभ घेऊन शासनास सहकार्य करावे. तसेच रोजगार मेळाव्यात उद्योजकांनी उपस्थित राहून आपल्याकडील रिक्तपदे उपलब्ध करून द्यावी व बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणेबाबत सहकार्य करावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहीतीसाठी 0712 -2531213 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 8788299971 भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.