पो.डा. वार्ताहर , औरंगाबाद : महसुल विभाग हा प्रशासनातील महत्त्वाचा विभाग असून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरला आहे. या विश्वासाला सार्थ ठरवत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांना विविध सेवांचा लाभ जलद व सुलभतेने द्यावा,असे आवाहन विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी केले.
येथील वंदे मातरम सभागृहात सोमवारी (दि.7) जिल्हास्तरीय महसुल सप्ताहाचा समारोप सोहळा पार पडला. त्यावेळी श्री.आर्दड बोलत होते. यावेळी उत्कृष्ट कार्य करणारे विविध महसुल अधिकारी- कर्मचारी तसेच त्यांच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनीष कलावानिया, उपायुक्त डॉ.अनंत गव्हाणे, अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जर्नादन विधाते तसेच उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि महसुल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
श्री. आर्दड म्हणाले की, शेतकरी हा महसुल प्रशासनाचा कणा आहे. कृषी संस्कृती ही महसुल विभागाशी कायमची जोडलेली आहे. हल्लीच्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करतांनाच त्यांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. महसुल विभागातील अधिकारी कर्मचारी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या मदतीसाठी कायम तत्पर रहावे. तसेच नागरिकांना पारदर्शकपद्धतीने कामकाज करुन सुविधा उपलब्ध करुन द्याव्या. लोकांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा. विकासाची कामे कालबद्ध कृती कार्यक्रम आखून पूर्ण करावे,असे आवाहन श्री. आर्दड यांनी केले.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले की, बदलत्या काळानुसार ई-कार्यप्रणाली चा जास्तीत जास्त वापर करुन महसुल अभिलेखे अद्यावत व अचूक करावे. महसुल अधिकारी व कर्मचारी यांच्यात अधिक विश्वास वृद्धींगत व्हावा. या अनुषंगाने काम करणे आवश्यक आहे. तलाठी ते जिल्हाधिकारी पदापर्यंत सर्व महसुल यंत्रणाने अद्यावत तंत्रज्ञान अवगत करावे.
महानगरपालिका आयुक्त जी.श्रीकांत म्हणाले की, महसूल विभाग शासनाच्या सर्व विभागांना समन्वय करणारा विभाग असुन अधिकाऱ्यांनाही ओळख देणारा विभाग आहे. डिजीटल तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. नाविन्यपूर्ण कार्यपद्धतीचा अवलंब करुन अभिलेखे अद्यावत करणे, कालमर्यादेत कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. शेतकरी, नागरिक, विद्यार्थी यांना जिल्हाधिकारी, तहसिल, तलाठी कार्यालयापर्यंत येण्याची गरज पडू नये, त्यासाठी सर्व सुविधा ऑनलाईन पद्धतीने द्याव्या.
पोलीस आयुक्त मनोज लोहिया म्हणाले की, पोलीस व महसुल प्रशासनाने विविध उपक्रमात समन्वयाने काम करुन लोकाभिमुख प्रशासनाची सुविधा देण्यास तत्पर राहावे.
जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना म्हणाले की, नागरिकांच्या अपेक्षांनुसार सेवा पूर्ती होणे आवश्यक आहे. तलाठ्यांनी नवीन कार्यपद्धतीनुसार सुधारणा करणे आवश्यक आहे. घरकुल योजना, पोटखराबी जमीन क्षेत्र, सातबारा, ई-पीक पाहणी, ई-पंचनामे याबरोबरच शासनाच्या विविध योजना शेतकरी यांना उपलब्ध करुन द्याव्या. महसुल सप्ताहामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांनी महसुल विभागाचे अभिनंदन केले.
अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे यांनी प्रास्तविकात महसुल सप्ताहाच्या कामगिरीबाबत माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्ताहात 81 ठिकाणी स्मशानभुमीची जागा उपलब्ध करुन देण्यात आली. 9 हजार 111 प्रमाणपत्राचे वितरण झाले. 56 आधार कार्डची दुरुस्ती, 14 अनाथ प्रमाणपत्र वाटप. एक हात मदतीच्या मध्ये 254 नागरिकांना लाभ. 92लोकअदालतीमधुन 2 हजार 224 फेराफार निकाली काढण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन कक्षा मार्फत 44 शिबिरांतून 4 हजार नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. 88 शेतरस्ते मोकळे करण्यात आले. ‘आपले सरकार’ पोर्टल वर 43 तक्रारींचे निराकरण. सैनिक कल्याण विभागाचे 37 प्रकरण निकाली काढले. 564 अधिकारी कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबींची पूर्तता. 692 अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी.
यानिमित्त तीन नवी वाहने महसूल विभागाच्या ताफ्यात दाखल झाली असून त्या वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
सृष्टी इंगळे, नक्षत्रा भदाणे, कुमार सोनटक्के, ओम सवणे, अनुष्का कांबळे या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोतवाल, शिपाई, तलाठी, पोलीस पाटील, लघुलेखक, महसुल सहायक, अव्वल कारकुन यांचा सत्कार करण्यात आला. तेजस्विनी जाधव आणि विजय चव्हाण यांना उत्कृष्ट तहसिलदार, वर्षाराणी भोसले, रामेश्वर रोडगे यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी , तर विधी अधिकारी ॲड. उषा वायळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे मारोती म्हस्के, नियोजन अधिकारी भारत वायळ, तंत्र अधिकारी शरद दिवेकर यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.