पो.डा. वार्ताहर , वाशिम : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अभियानाच्या माध्यमातून होत आहे. ‘मेरी मेटी मेरा देश’ हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून या अभियानाला गावपातळी ते शहरस्तरावर लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
जिलहयातील 491 पंचायतीमध्ये आणि पंचायत समितीच्या कार्यालयात आज 9 ऑगस्ट रोजी लोकप्रतिनिधी व अधिकारी- कर्मचारी यांच्या वतीने पंचप्रण शपथ घेण्यात आली. या अभियानाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात आयोजित कार्यक्रमाला पदवीधर शिक्षक मतदार संघाचे आमदार ॲड. किरणराव सरनाईक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हातात माती घेऊन सामुहिक पंचप्रण शपथ घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिनकर जाधव, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, शिक्षण अधिकारी राजेंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्र व राज्य सरकारच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त मेरी मिट्टी, मेरा देश हे अभियान राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत या अभियानांतर्गत ९ ते 16 ऑगस्टदरम्यान विविध प्रकारचे पाच उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात ‘वसुधा वंदन’ उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत गावातील योग्य ठिकाणची निवड करुन 75 देशी वृक्षांची लागवड करून अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे. आज सर्वत्र पंचप्रण शपथ घेऊन या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
भारताला २०४७ पर्यंत विकसित बनविण्याचे स्वप्न साकार करण्याची, गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकण्याची, देशाच्या समृद्ध वारसाचा अभिमान सदैव बाळगण्याची, एकता व एकजूट यासाठी कर्तव्यदक्ष राहण्याची, नागरिकांचे कर्तव्य बजावण्याची व देशाचे रक्षण करणाऱ्यांचा कायम आदर राखण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.
सेल्फी पॉईंटवर आमदार आणि सीईओ यांच्यासह कर्मचाऱ्यांनीही घेतले सेल्फी
‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अभियानांतर्गत जिल्हा परिषद परिसरात तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्यासह विभाग प्रमुखांनी सेल्फी घेतली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सेल्फीसाठी एकच गर्दी केली. गर्दी वाढल्यानंतर रांगा लावुन महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी सेल्फी घेतली. आणि काढलेली सेल्फी समाज माध्यमावरही अपलोड केली. प्रास्ताविक दिगंबर लोखंडे यांनी केले. उपस्थितांचे आभार गजानन डाबेराव यांनी मानले.