मुंबई मंत्रालय येथे मदत व पूनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेत मागणी
पो. डा. वार्ताहर, चंद्रपूर : चंद्रपूरात वारंवार उद्भवत असलेल्या पूर परिस्थितीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या इरई नदी काठी पूर सरंक्षण भिंतीच्या बांधकाम प्रस्तावास तात्काळ मंजूरी प्रदान करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेत केली आहे.
अल्पशा पावसाने चंद्रपूरात वारंवार पुरपरिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या भागात जिवीतहाणी होण्याची शक्यताही बढावली आहे. त्यामुळे आता याचे योग्य नियोजन करुन भविष्यात उद्भवणा-या पूरपरिस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. सदर विषय आमदार किशोर जोरगेवार यांनी उचलून धरला असून पावसाळी अधिवेशनातही त्यांनी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधत यावर कायमस्वरुपी उपायोजना करण्याची मागणी केली होती.
चंद्रपूर शहराच्या पश्चिमेला वाहणाऱ्या इरई नदीकाठा जवळील परिसरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. पावसाळयात अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी या सखोल नागरी भागात शिरत आहे. सन २००६, २०१३ आणि २०२२ तसेच या वर्षी सुद्धा या भागात पुरपरिस्थीती निर्माण झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागातील घरांचे नुकसान होवून वित्तहानी झाली आहे. दरवर्षी सखोल भागात पूर परिस्थिती उद्भवत आहे. त्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पुरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
या विषयाची गंभीरता लक्षात घेत राज्य शासनानेही पुरसंरक्षण भिंत बांधकामाचा प्रस्ताव तयार करण्याबाबतचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले असून तसा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. पडोली पूल ते चौराळा पुलाचे अंतर ७ किमी असून नदीच्या समांतर डाव्या बाजूस चंद्रपूर शहराची लोक वस्ती आहे. या संपूर्ण लांबी मध्ये पूर संरक्षक भिंतीची आवश्यकता आहे,
सदर पूर संरक्षण भिंत बांधकाम बाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती चंद्रपूर यांच्या सभेत शासनातर्फे निर्देश दिल्यानुसार प्राधिकरणाची मान्यता घेऊन दिनांक 23.12.2022 रोजीच्या 24 कोटी 94 लक्ष 13 हजार 237 रुपये या रक्कमेत आवश्यकतेनुसार बदल करत सुधारित रक्कम 49, कोटी 34 लक्ष 19 हजार, 908 रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देऊन तो शासनास सादर करण्यात आला आहे. आता मदत व पूनर्वसन विभागानेही या प्रस्तावास मंजुरी प्रदान करावी यावी अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार त्यांनी मदत व पूनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना केली आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची ना. अनिल पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे.