पो.डा. वार्ताहर, औरंगाबाद : सकारात्मक विचारसरणीचा अवलंब केल्यास आपण कोणत्याही व्यसनाला दूर ठेवू शकतो आणि सुदृढ जीवन जगू शकतो, असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी केले.
विभागीय समाज कल्याण कार्यालय, जिल्हा समाज कल्याण कार्यालय व आरोग्य जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशा मुक्त अभियान’, हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आरोग्य जागृती मासिकाच्या अंकाचे विमोचन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डॉ. उज्वला दहिफळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. रुणवाल, डॉ.शेख यांनी सुद्धा मार्गदर्शन केल. प्रबोधनपर गीतांच्या माध्यमातून नशामुक्ती विषयी जागृती करण्यात आली. अनुदानित वस्तीगृहातील कर्मचारी, सहाय्यक आयुक्त जिल्हा परिषद, जाती पडताळणी तसेच विविध महामंडळातील कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.