पो.डा.वार्ताहर , चंद्रपूर : जागतिक स्तनापन सप्ताहानिमित्त जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन आरोग्य विभाग, इंडीयन मेडीकल असोसिएशन चंद्रपूर शाखा व फॉग्सी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे तर उद्घाटक म्हणून वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. सरिता हजारे उपस्थित होत्या.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, डॉ. प्राची नेहुलकर, डॉ. प्रिती राजगोपाल, आयएमएच्या सचिव डॉ. कल्पना गुलवाडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मनिषा वासाडे, फॉग्सीचे सचिव डॉ. आनंद ठिकरे उपस्थित होते. केंद्र शासनाने स्तनपानाच्या पध्दती सुधारण्याच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी स्तनपान करणा-या मातांसाठी सक्षम वातावरण निर्माण करणे आणि बालमृत्यु कमी करणे. पोषण सुधारणा आणि बालपणीच्या लवकर विकासामध्ये स्तनपानाच्या भुमिकेवर जोर देण्यासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ निर्माण व्हावे, या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलतांना शल्य चिकित्सक डॉ. चिंचोळे म्हणाले, मातेचे दुधच हे बालकाचे उज्वल भविष्य असून त्यामुळेच बालकांमध्ये सुदृढपणा येतो. तर स्तनपान हे अमृतपान आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांनी सांगितले. यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
‘स्तनपानाचे सक्षमीकरण : नोकरदार पालकांसाठी एक बदल’ ही या वर्षीची स्तनपान सप्ताहाची थीम आहे. एन.एफ.एच.एस. – 5 च्या अहवालानुसार राज्यातील स्तनपानाची सद्यस्थिती लक्षात घेता स्तनपानाची लवकर सुरूवात करण्यासाठी आरोग्य सेवा देणा-यांची क्षमता वाढविणे, सामान्य आणि सिझेरीयन प्रसुतीमध्ये कोलोस्ट्रम फिडींगचा वापर या मुख्य बाबींवर लक्ष केंद्रीत करून जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्राची नेहुलकर यांनी तर संचालन सुरेखा सुत्राळे यांनी केले.