नागपूर. नागपूर महानगरपालिकेतील कनिष्ठ स्वास्थ निरिक्षकांचे विभागीय पदोन्नती परिपत्रक क्र. 68/ आस्थापना, दि. 09/05/2022 च्या प्रकाशित झालेल्या मुलाखत यादीवर आक्षेप नोंदवून नागपूर जिल्हा महानगरपालिका कामगार संघटनेद्वारे सदर प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांना निवेदन दिले.
कनिष्ठ स्वास्थ निरिक्षकांच्या पदोन्नतीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून न्याय प्रविष्ठ आहे. कनिष्ठ स्वास्थ निरिक्षकांच्या पदोन्नतीमध्ये ठराव क्र. 168. दि.26/10/2015 नुसार ‘अ’ या मुद्दयाला वगळून ‘ब’ नुसार पदोन्नती देण्यात येत असल्यामुळे बाब ‘अ’ मध्ये उल्लेख असल्यानुसार मलवाहक जमादारांना या पदोन्नतीपासून मुकावे लागेल. त्यामुळे घनकचरा विभागाशी व आरोग्य विभागाशी सर्वात जास्त अनुभव स्थापना विभाग असलेले मलवाहक जमादार पदावरील कर्मचा-यांना पदोन्नती पासून वगळण्यात येत कनिष्ठ स्वास्थ निरिक्षकांच्या पदोन्नतीमध्ये ठराव क्र. 168, दि. 26/10/2015 नुसार पदोन्नती देण्यात येत असल्यामुळे किती जागा भरण्यात येतील याची पारदर्शिकता अप्राप्त आहे. पदोन्नती देताना ठराव क्र. 168, दि. 26/10/2015 नुसार ‘अ’ व ‘ब’ 50 टक्के व 50 टक्के यानुसार सोबत पदोन्नती देण्यात यावी. त्यामुळे मलवाहक जमादार पदोन्नतीपासून वंचित राहणार नाही, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले 1800 ग्रेड पे वरील मलवाहक जमादार यांच्या भविष्यातील पदोन्नतीबाबत विभागातर्फे माहिती अप्राप्त आहे. मनपा ठराव क्र. 296 नुसार धोरणात बदल करुन मलवाहक जमादारांना 5200-20200 ग्रेड पे 1800 वर आणण्यात आले. तसेच मनपा ठराव क्र. 168 ‘ब’ मध्ये सुद्धा ग्रेड पे 1800 वरील मलवाहक जमादार यांना स्वास्थ निरिक्षकांच्या पदोन्नती यादीमध्ये समाविष्ठ करावे.
उपरोक्त कारणानुसार दिलेले आक्षेप स्वीकृत करुन कनिष्ठ स्वास्थ निरीक्षक पदाकरीता होणारी दि. 17/05/2023 रोजीची मुलाखत थांबविण्यात यावी व मलवाहक जमादार जे 1800 ग्रेड पे वर कार्यरत आहेत त्यांना स्वास्थ निरिक्षक पदोन्नती यादीमध्ये समावून घेउन पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी करतानाच यासंदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास संघटनेतर्फे आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही नागपूर जिल्हा महानगरपालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिला आहे.