पो.डा.वार्ताहर , परभणी : भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर ‘ढाई आखर’ ही निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा विषय ‘डिजिटल इंडिया फॉर न्यू इंडिया’ अर्थात ‘डिजिटल भारतामधून नवीन भारत निर्माण’ असून या विषयावर कोणत्याही भाषेमधून निबंध लिहता येणार आहे.
ही निबंध लेखन स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आली असून, पहिला गट १८ वर्षापर्यंत तर दुसरा १८ वर्षापुढील आहे. त्यासाठी स्पर्धकांनी १ जानेवारी २०२३ रोजी ‘माझे वय १८ पेक्षा कमी/जास्त आहे’ असा स्पष्ट उल्लेख करावा. तसेच आपले नाव, पत्ता व वयाचा उल्लेख करावा. जसे की, मी असे प्रमाणित करतो की, माझे वय दिनांक ०१.०१.२०२३ रोजी १८ वर्षापेक्षा अधिक / १८ वर्षा पेक्षा कमी आहे’ असा स्पष्ट उल्लेख असावा.
हा निबंध मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांच्या नावाने लिहून जवळच्या टपालपेटी किंवा टपाल कार्यालयात द्यावा. निबंधाची शब्दमर्यादा १ हजार असून व अंतर्देशीयसाठी ५०० शब्दमर्यादा आहे. निबंध ३१ ऑक्टोबर २०२३ पूर्वी पोहचेल, या रितीने पाठवावा तसेच तो 31 ऑक्टोबर २०२३ नंतर पाठवलेल्या निबंधाचा स्पर्धेमध्ये समावेश करण्यात येणार नाही. दोन्ही वयोगटाच्या स्पर्धकांसाठी पाकीट आणि अंतर्देशीय अशा दोन्ही विभागातून एकूण ४ प्रथम, ४ द्वितीय आणि ४ तृतीय क्रमांक निवडले जाणार आहेत.
उत्कृष्ट निबंधलेखनासाठी राज्यस्तरावर प्रथम २५ हजार, द्वितीय १० हजार आणि तृतीय पारितोषिक ५ हजार रुपये प्रदान करण्यात येईल. राज्यस्तरावर प्रत्येक गटातून निवडलेल्या तीन उत्कृष्ट निबंधांना राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यात येईल आणि राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या उत्कृष्ट निबंधासाठी अनुक्रमे ५० हजार, २५ हजार आणि १० हजार रुपये रकमेची रोख पारितोषके देण्यात येतील.
तरी ‘ढाई आखर’ या राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन डाक अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी केले आहे.