पो.डा.वार्ताहर,नागपूर : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सन 2023-24 या वर्षात नागपूर जिल्ह्यास नेमून दिलेले पुर्नरचनात्मक शस्त्रक्रियेचे 15 रुग्णांचे उद्दीष्टांची पूर्तता करण्याचे दृष्टीने आज जिल्ह्यातील विकृती असलेल्या रुग्णांची पुर्नरचनात्मक शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन एन.के. पी. साळवे इंस्टीटयूट ऑफ मेडीकल सायंस अॅण्ड रिसर्च सेंटर तथा लता मंगेशकर हॉस्पीटल हिंगण्याचे अधिष्ठाता डॉ.काजल मित्रा यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे.
पुर्नरचनात्मक शस्त्रक्रिया शिबीरामध्ये एकूण 10 रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आलेली असून त्यामध्ये हाताची वाकडी बोटे असलेले 3, फुट ड्रॉप 3 व पायाला गंभीर जखमा असलेल्या 4 असे एकूण 10 कुष्ठरुग्णांवर पुर्नरचनात्मक शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. तसेच शासनाच्या निकषानुसार सदर शस्त्रक्रिया पात्र रुग्णास शस्त्रक्रिया झाल्यावर 8 हजार रुपये अनुदान दिल्या जाते. सन 2022-23 मध्ये याच संस्थेत एकूण 16 पुर्नरचनात्मक शस्त्रक्रिया झालेल्या असून सर्व रुग्णांना अनुदान त्यांचे बँक अकाऊंट मध्ये जमा करण्यात आलेले आहे.
या विकृती रुग्णांवर डॉ. अशोक गोल्हर अस्थीरोग तज्ञ, डॉ. सुशील मानकर विभाग प्रमुख अस्थिरोग विभाग, एन. के. पी. साळवे इंस्टीटयुट ऑफ मेडीकल सायंस अॅण्ड रिसर्च सेंटर तथा लता मंगेशकर हॉस्पीटल व त्यांच्या चमूने यशस्वीरित्या पुर्नरचनात्मक शस्त्रक्रिया पूर्ण केल्या. या पुर्नरचनात्मक शस्त्रकियेच्या शिबीराचे आयोजन सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. दिपिका साकोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रतिभा बांगर, डॉ. शाजीया शम्स, डॉ. संजय पुल्लकवार तसेच डॉ. सिद्धीकी व जिल्हा पर्यवेक्षक डी.डी. अवसरकर यांनी केले.