पो.डा. वार्ताहर, पुणे : पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांनी आपण कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली धरणाची आणि चांदोली अभयारण्याची रेकी केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पाटबंधारे विभाग आणि पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पुणे पोलिसांनी मोटार सायकल चोरीच्या संशयावरून मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद साकी या दोन दहशतवाद्यांना अटक केली. त्यानंतर केलेल्या तपासात या दोघांनी आपण चांदोली धरण परिसरात रेकी केल्याची कबुली दिली. यानंतर एबीपी माझाने चांदोली धरणाच्या सुरक्षेचा आढावा घेतला. कोल्हापूर पोलीस आणि सांगली पोलिसांच्या चौक्या धरणाच्या उत्तर आणि पश्चिम दिशेला आहेत. सगळ्यात आधी कोल्हापूर पोलिसांच्या चौकीत गेल्यानंतर तर पोलीस कर्मचारी निवांत विश्रांती घेत होते. चार पैकी एकच कर्मचारी एका वेळी कार्यरत असल्याचं चित्र आहे.
धरणाच्या सुरुवातीलाच सांगली पोलिसांची चौकी आहे. मात्र त्याठिकाणी एकच कर्मचारी आहे. चांदोलीत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण आहे. अनेक मार्गांनी धरणावर नागरिक पोहचल्याचे अनेक वेळा समोर आलं आहे आणि या धरणाची सुरक्षा काही मोजक्या कर्मचाऱ्यांवर आहे. पाटबंधारे विभागाचे कर्मचारी देखील केवळ 12 आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शस्त्रधारी पोलीस 24 तास पहारा देत आहेत अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पण प्रत्यक्ष चित्र मात्र वेगळंच आहे.
चांदोली धरण आणि चांदोली अभयारण्य परिसर खूप मोठा आहे. मात्र इथं केवळ सात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. दहशतवाद्यांनी नेमकी कुठं रेकी केली? काय केलं हे समोर येईलच. पण आपण आपल्या बाजूनं किती तयारीत आहोत हे आज चांदोली धरणावर गेल्यानंतर दिसून आलं.
दरम्यान, पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे आणि परिसरातील सुनसान जागी स्फोट करण्यासाठी बॉम्बस्फोट (Bomb Blast) करण्याची प्रॅक्टिस केल्याचं एटीएसच्या (ATS) तपासात समोर आलं आहे. दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती एटीएसने कोर्टात दाखल केलेल्या अहवालात नमूद केली आहे. दरम्यान त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याची (यूएपीए) कलमवाढ करण्यात आली आहे.
मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ या दोन दहशतवाद्यांना मागील सोमवारी मध्यरात्री गस्तीवर असलेल्या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सनी संशयास्पद हालचाली जाणवल्याने पकडले. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम हा यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाला.