पो. डा. प्रतिनिधी.
मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईकडे जाणारे दोन कंटेनर आज सकाळी दहा वाजता इगतपुरी पोलीसांनी पकडले, त्या कंटेनरमधून सव्वा कोटी रूपयांचा अवैध गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.
बऱ्याच दिवसांपासून नाशिक ग्रामीण पोलीस या कंटेनरसाठी सापळा रचून त्याचा शोधात होते. आज सकाळी गुटख्याने भरलेले सदरचे कंटेनरने इगतपुरी परिसरात प्रवेश केला असता, इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजू सुर्वे व अंमलदारांनी सदरचे कंटेनर नं. HR-47 E-9140 व HR-38Z-3937ताब्यात घेतले आहेत.
जप्त करण्यात आलेला गुटखा हा हरियाणा मधून भिवंडी येथे जात असल्याचे निदर्शनास आले. जप्त केलेल्या मालात ४ के स्टार आणि एस एच के या प्रतिबंधीत गुटख्याचा समावेश आहे.
सदर प्रकरणी इगतपुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ११२ / २०२३ भादवि कलम ३२८, २७२, २७३, ४२०, १८८, ४६५, ४६८, ४७१, ३४ सह अन्न सुरक्षा मानके कायदा सन २००६ चे कलम ५९ अन्वये चार इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. राजू सुर्वे, पोलीस निरीक्षक, इगतपुरी हे करीत आहेत.
सदर प्रकरणात, आतापर्यंत सलमान आमीन खान, वय ३२, व इरफान आमीन खान, वय ३१, दोन्ही रा. नखरोला, ता. होडल, जि. जलवाल, हरियाणा यांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे सख्खे भाऊ असून मागील काही वर्षांपासून ते गुटख्याचे धंद्यात आहेत.
उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी पोलीस पथकास २५,००० रू. चे बक्षीस जाहीर करून अभिनंदन केले आहे.