पो. डा. नाशिक
जिल्ह्यातील (४६) अवैध दारू अड्ड्यांवर ग्रामीण पोलीसांचे एकाच वेळी छापे दहा लक्ष रुपयांची तयार दारू, रसायन व साहित्य जप्त रसायन बनविण्यासाठी लागणा-या गुळ व नवसागर विक्रेत्यांवरही पोलीसांचे धाड सत्र नुकतेच झाले.
२५ मे रोजी पहाटे चार वाजता ग्रामीण पोलीसांच्या सुमारे ५०० अधिकारी व अंमलदारांनी नाशिक ग्रामीण हद्दीत विविध ठिकाणी गावठी दारूची अवैधपणे गाळप करणा-या एकूण ४६ ठिकाणी एकाच वेळी छापा टाकून सुमारे दहा लक्ष रुपयांची तयार दारू, रसायन व इतर साधन सामुग्री जप्त करून संबंधीतांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली ३४ गुन्हे दाखल केले आहेत.
या धाडसत्रात जिल्ह्यातील कळवण मधील ११, वाडीव-हे मधील ५, मालेगाव तालुका हद्दीतील ४, सुरगाणा, घोटी, देवळा, सटाणा, जायखेडा व इगतपुरी मधील प्रत्येकी ३, निफाड व पेठमधील प्रत्येकी २, सिन्नर, अभोणा, वणी व त्रंबकेश्वर मधील प्रत्येकी एका ठिकाणाचा समावेश आहे.
सदर कारवाईदरम्यान पोलीसांनी अवैध दारु गाळप करणा-या ठिकाणांसोबतच, रसायन बनवण्यासाठी लागणा-या गुळ विक्रेत्यांवरही कारवाई करून विशेषत: सटाणा तालुक्यातील ठेंगोडा व देवळा तालुक्यातील लोहणेर गावांतून मोठ्या प्रमाणावर काळा गुळ व नवसागर जप्त केला आहे.
सदर कारवाईत पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती यांचेसह सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. तेगबीरसिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदीप जाधव, श्री. पुष्कराज सूर्यवंशी, श्रीमती कविता फडतरे, ३१ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचेसह ९ विशेष पथकांनी सहभाग घेतला होता.
अवैध व्यवसाय रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीसांनी नुकतीच १२ विशेष पथके गठीत केली असून त्यांच्या मदतीने जिल्ह्यातील वेगवेगळया ठिकाणी चालणा-या अवैध व्यवसायांवर धडक कारवाया करण्यात आल्या आहेत.
अवैध धंद्यांसंबंधी नागरिकांनी ६२६२ २५६३६३ या हेल्पलाइनवर माहीती द्यावी, माहीती देणा-या इसमाचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी जनेतेला आवाहन केले आहे.