पो. डा. वार्ताहर , सातारा : महाबळेश्वर तालुक्यात प्रवर्गानुसार कोतवालाची भरतीद्वारे नेमणूक केली जाणार आहे. या भरतीसाठीचे अर्ज महाबळेश्वर तहसील कार्यालयात दि.20 ते 28 जुलै 2023 अखेर उपलब्ध असून इच्छूकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज समक्ष दाखल करावा, अशी माहिती तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील यांनी दिली.
कोतवाल भरतीसाठी जात प्रवर्गानुसार आरक्षित गावाची नावे पुढीलप्रमाणे आहेत. अनुसूचित जाती- रुळे, रेणोशी व गावढोशी (रुळे सजा), भटक्या जमाती क- अहिर, वाळणे, आवळण, व गाढवली (अहिर सजा), अनुसूचित जाती महिला- पाचगणी, तायघाट, दांडेघर, (पाचगणी सजा), अनुसचित जमाती – गोगवे, रामेघर, वारसोळी कोळी, वारसोळी देव (गोगवे सजा), आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक – सौंदरी, कुरोशी, लाखवड (सौंदरी सजा), आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक महिला- राजपूरी, खिंगर, आंब्रळ, गोडवली (राजपूरी सजा).
कोतवाल पदाकरीता 100 गुणांची लेखी परिक्षा असून दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 12 दरम्यान प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येईल. कोतवाल पदाच्या भरतीसाठीच्या सविस्तर अटी व शर्तीची माहिती पंचायत समिती, व तहसील कार्यालय, तसेच संबंधित गावच्या चावडीच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.