पो. डा. वार्ताहर , वाशिम : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम,जिल्हा रुग्णालय वाशिम अंतर्गत आज १४ जुलै रोजी मानोरा तालुक्यातील इंगलवाडी येथील श्री.गजाधर राठोड माध्यमिक आश्रमशाळा येथे शालेय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी मुख्यध्यापक व्ही.एल.जाधव हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणारे विविध आजार, तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ नियंत्रण कायदा (कोटपा 2003), तंबाखू मुक्त शाळा निकष याबाबत शालेय विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.जिल्हा सल्लागार डॉ.आदित्य पांढारकर यांनी तंबाखूजन्य पदार्थामूळे होणारे मुख कर्करोग व त्याची प्राथमिक लक्षणे याबाबत पोस्टर चित्राच्या माध्यमातून विद्यर्थ्याना मार्गदर्शन केले. तसेच तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट सोडवण्यासाठी असलेला टोलफ्री क्रमांक 1800112356 याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शालेय विद्यार्थी व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.