पो. डा. वार्ताहर , बुलडाणा : जिल्ह्यातील औद्योगिक परिसरात उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करण्यात येत आहे. उद्योग वाढीसाठी उद्योजकांना प्रोत्साहन दिल्यास यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. तसेच उद्योगांना आवश्यक असणारे सहकार्य दिल्यास जिल्ह्यातून उद्योजक बाहेर जाणार नाहीत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले.
जिल्ह्यातील उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ, कौशल्य विकास विभागाच्या सहायक संचालक प्रांजली बारस्कर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी सुरवातीला जिल्ह्यातील उद्योगांना बँकांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या पतपुरवठ्याबाबत माहिती घेतली. उद्योगांना मंजूर झालेला पतपुरवठा तातडीने करण्यात यावा. याबाबतची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्यात यावी. कर्ज प्रकरणे मंजूर होऊनही पतपुरवठा प्रलंबित असलेली बाब गंभीर असल्याने याबाबतचा अहवाल शुक्रवारपर्यंत सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्हा निर्यात धोरणानुसार जिल्ह्यात निर्यातक्षम उद्योग निर्माण व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. उद्योगांना पूरक वातावरण तयार करून निर्यात वाढविण्यासाठी उद्योगांनी प्रयत्न करावेत. निर्यात करणाऱ्या उद्योगांनी जिल्ह्यातून होणाऱ्या निर्यातीची माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यातील उद्योगांनी उत्पादित केलेल्या मालाची प्रचार, प्रसार तसेच पॅकेजिंग, ब्रँडींगसाठी विवेकानंद महाविद्यालयाशी करार करण्यात आला. या करारामुळे कृषिवर आधारित असणाऱ्या उद्योगांना सहकार्य होणार आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी बाजारपेठेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यातून रोजगार निर्मिती होण्यासोबतच स्थानिक उद्योगांना विकासासाठी प्रोत्साहन मिळेल. जिल्ह्यात उत्पादीत होणारे उत्पादन विक्रीसाठी खरेदी-विक्री करणाऱ्यांची संमेलन आयोजित करण्यासंदर्भात सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
यावेळी चिखली, खामगाव, बुलढाणा येथील औद्योगिक वसाहतींना जाणवणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. उद्योजकांनी मांडलेल्या समस्यांवर संबंधित यंत्रणांनी उद्योगांना येत असेल अडचणी समजून घेऊन, त्यानुसार तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.