पो. डा. वार्ताहर , बुलडाणा, दि. 12 : उद्योजकांना त्यांच्या अपेक्षेनुसार मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी उद्योगातील आवश्यक जॉबरोलनिहाय नोंदणी 31 जुलैपर्यंत करावी, तसेच कौशल्याची मागणी सर्वेक्षण मोहिमेत उद्योजकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.
उद्योजकांच्या समस्या जाणून घेताना मनुष्यबळाच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी उद्योजकांच्या सोयीसाठी शासनाने उद्योजकांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी नोंदणी करावी. या नोंदणीमुळे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासोबतच उद्योजक आणि रोजगार आवश्यक असलेल्या युवकांची सोय होणार आहे. जिल्ह्यामध्ये उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मोठ्या उद्योगांमध्ये कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा विविध प्रकारच्या जॉबरोलनिहाय आवश्यक असलेल्या कौशल्याची गरज असते. ही गरज कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविण्यता विभागाकडे नोंदविल्यास त्या कौशल्य अभ्यासक्रमाचा समावेश कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये करण्यात येणार आहे.
शासनाच्या प्रयत्नामुळे प्रशिक्षणामध्ये यशस्वी उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या प्रमाणात वाढ होते. त्यानुसार जिल्ह्यात सर्वेक्षण मोहिम सुरू करण्यात आली आहे. सर्व उद्योगांकरिता मनुष्यबळामध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी दि. 31 जुलै 2023 पर्यंत करता येणार आहे. सदर मोहिमेंतर्गत सर्वेक्षणासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. या गुगल फॉर्म लिंकद्वारे उद्योगातील आवश्यक जॉबरोलनिहाय कौशल्याची गरज नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी आस्थापनाना केली आहे.
नोकरी ईच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच उद्योजकांना आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासाठी उद्योजक आणि कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाद्वारे करार करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उद्योगांनी करार करण्याचा सूचना जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी दिल्या. यावेळी सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी या मोहिमेची सविस्तर माहिती दिली.