पो. डा. वार्ताहर , नाशिक : नाशिकमध्ये (Nashik Crime News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मांत्रिक महिलेची तिच्याकडे उपचारांसाठी येणाऱ्या भक्तानेच चाकूने भोसकून हत्या केली आहे. ही घटना (Nashik Crime News) शुक्रवारी दुपारी शिंदे गावातील शिवरत्ननगर या ठिकाणी घडली आहे. जनाबाई भिवाजी बर्डे (वय 45) असे हत्या झालेल्या मांत्रिक महिलेचे नाव आहे तर निकेश दादाजी पवार (वय 41, रा. जेलरोड) असे हत्या करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे शिंदे गावामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
जनाबाई बर्डे ही महिला शिंदे गावात राहत्या घरात सुख-दु:खाचे बघणे, बाहेरचे बघणे, त्यावर मार्ग, तोडगा सांगत असे. आजूबाजूच्या परिसरातील रुग्ण तिच्याकडे उपायांसाठी येत होते. संशयित आरोपी निकेश दादाजी पवार हा देखील दोन वर्षांपासून त्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी मृत जनाबाई बर्डे यांच्याकडे येत होता. मात्र, त्याला जनाबाईने सांगितलेल्या तोडग्याचा काहीही फायदा न झाल्याने त्याला राग आला होता.
शुक्रवारी दुपारी जनाबाईकडे मार्ग सांगण्याचा वार होता. त्यामुळे निकेश नेहमीप्रमाणे शिंदे गावात जनाबाईच्या घरी गेला. त्यावेळी घरात असलेल्या जनाबाईवर त्याने सोबत आणलेल्या चाकूने मानेवर, पोटावर सपासप वार केले आणि घटनास्थवरून पळ काढला. यादरम्यान घटनास्थळी हत्या झालेल्या जनाबाई बर्डेची मावसबहीण रंजना माळी आली. तिला बहीण रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली आणि हाती चाकू असलेला संशयित निकेश पवार घराबाहेर पडताना दिसल्याने तिने मदतीसाठी आरडाओरडा करत निकेशचा पाठलाग केला. काही नागरिकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण तो गावातून बाहेर पडला.
या घटनेची (Nashik Crime News) माहिती मिळताच पोलिस शिपाई विष्णू नाईक, मनोहर कोळी या पोलिसांनी शिंदे टोल नाका गाठून संशयित निकेश पवार याला ताब्यात घेतले. पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे, वरिष्ठ निरीक्षक देवीदास वांजळे, सहाय्यक निरीक्षक गणेश शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत या घटनेचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.