जलयुक्त शिवार अभियानाच्या नाला खोलीकरण व वृक्ष लागवडीचा आढावा
पो. डा. वाशिम : जिल्हयात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत वृक्ष लागवडीची व जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात करतांना नाला खोलीकरणाच्या कामांना प्राधान्य द्यावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जलशक्ती अभियान,जलयुक्त शिवार व वृक्ष लागवडीचा आढावा घेतांना श्री.षण्मुगराजन बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, लक्ष्मण मापारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अरिफ शहा आणि जिल्हा भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री.कडू यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. षण्मुगराजन म्हणाले, जलशक्ती अभियानाच्या आराखडयातील कामे जलशक्ती अभियान पोर्टलवर अपलोड करावी. यंत्रणांनी या अभियानांतर्गत नाला खोलीकरणाचे व वृक्ष लागवडीची कामे यंत्रणांना दिलेल्या उदिष्टानुसार करावी. वृक्ष लागवडीच्या कामांचा तालुकानिहाय आढावा घेवून संबंधित यंत्रणांनी वृक्ष लागवडीची कामे जुलै अखेरपर्यंत प्राधान्याने करावी. असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
श्री. षण्मुगराजन पुढे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात ज्या गावांमध्ये अद्यापही कामे सुरु झालेले नाही. त्या गावातील कामांची तातडीने प्रशासकीय मान्यता घेवून ही कामे सुरु करावी. या अभियानात कामे करतांना निधीची कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. जलसंधारणाची ज्या यंत्रणांची कामे पुर्ण झाली आहे, त्या यंत्रणांनी झालेल्या कामाची देयके जलसंधारण विभागाकडे सादर करावी. असेही श्री. षण्मुगराजन यांनी सांगितले.
यावेळी कारंजाचे उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगांबर लोखंडे, जिल्हा परिषदेचे सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी आर.डी. बिजवे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सहायक कार्यकारी अभियंता जी.पी. घुगे, सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सर्व गटविकास अधिकारी व संबंधित यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते,