पो. डा. वार्ताहर : भाजपची कुटील नीती आणि पक्षातील बंडखोरांना धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुनःश्च हरिओम करीत प्रचंड उत्साहात मैदानात उतरले आहेत. कराडच्या प्रीतीसंगमावर आज शरद पवार यांनी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आपले राजकीय गुरू स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रणशिंग फुंकले. यावेळी हजारो समर्थकांची गर्दी उसळली. ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ हा विश्वास शरद पवारांना देण्यासाठी भरपावसात जनता रस्त्यावर उतरल्याचे चित्र सातारा, कराड दौऱ्यात दिसले. यावेळी शरद पवार यांनी ‘अजित पवार म्हणजे पक्ष नाही’ असे स्पष्टपणे सुनावतानाच महाराष्ट्र पिंजून काढू आणि नव्या कार्यकर्त्यांना संधी देत महाराष्ट्राचे चित्र पालटून दाखवू, असा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, पक्ष, चिन्हासाठी अजित पवार गट आणि राष्ट्रवादीमध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.
रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नेते मिंधे सरकारमध्ये सामील झाले. या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी कराडला जाऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहोत, असे जाहीर केले होते. त्यानुसार आज शरद पवार यांचा पुण्यातून सातारा, कराड दौरा झाला. या संपूर्ण दौऱ्यात ठिकठिकाणी लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पुष्पगुच्छ, हार देऊन, फुले उधळून स्वागत करत होते.
प्रीतीसंगमाचा परिसर शहारून आणि मोहारून गेला
प्रीतीसंगमावर अलोट गर्दी उसळली होती. त्यात तरुणांची संख्या मोठी होती. गर्दीने हा परिसर शहारून आणि मोहारून गेला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शरद पवार यांच्याबरोबर सातारा, सांगली जिह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी होते. काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत पवार म्हणाले, ‘‘उद्यापासून महाराष्ट्रभर दौऱ्यावर जात असताना गुरूंचा आशिर्वाद महत्वाचा आहे. त्यात आज गुरूपौर्णिमा असल्याने प्रीतीसंगमाशिवाय आशिर्वाद घेण्यासाठी दुसरे योग्य ठिकाण असूच शकत नाही.’’
नव्या कार्यकर्त्यांना संधी देत महाराष्ट्राचे चित्र पालटून दाखवू
कराडनंतर शरद पवार यांचे सातारा येथे जोरदार स्वागत करण्यात आले. येथील पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. अजित पवार पक्षावर दावा सांगत आहेत याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले, अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे. ज्यांच्यासोबत आमचा संघर्ष आहे, त्यांच्यासोबत आमचे काही सहकारी गेले आहेत. त्यामुळे नव्या पिढीला आम्ही नाउमेद होऊ देणार नाही. महाराष्ट्रातील तरुण हा वैचारिक बैठक असणारा आहे. या नव्या पिढीच्या समवेत लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी पुन्हा एकदा नव्या उमेदीने उभा राहणार आहे. महाराष्ट्र पिंजून काढत, नव्या कार्यकर्त्यांना संधी देत महाराष्ट्राचे चित्र पालटून दाखवू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
भुजबळ, तटकरे, वळसे-पाटील, पटेल यांचा विषय दोन शब्दांत संपवला
छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे ही विश्वासू मंडळी तुम्हाला सोडून गेल्याचे दुःख वाटते का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच शरद पवार यांनी अजिबात नाही! मला दुःख वाटत नाही, असा दोन शब्दांत विषय संपवला. ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादीत फूट पडली असे मी म्हणणार नाही. माझे सहकारी मला सोडून गेले. या अवघड परिस्थितीचा मला जुना अनुभव आहे. एवढय़ा संकटातही आपण इतके कॉन्फिडंट असताना सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यात अस्वस्थता दिसते? असा प्रश्न विचारला असता, तुम्ही चिंता करू नका, पक्षाचा नेता इतका कॉन्फिडंट असेल तर बाकीची सेना रिचार्ज व्हायला वेळ लागत नाही, असे पवार यांनी सांगितले.
काँग्रेसची मागणी रास्त
विधानसभेचा विरोधी पक्षनेता काँग्रेसचा होईल, अशी चर्चा आहे याकडे लक्ष वेधले असता, शरद पवार म्हणाले, ज्यांच्याकडे विधानसभेचे जास्त सदस्य आहेत तो पक्ष या पदाची मागणी करू शकतो. माझी जी माहिती आहे त्यानुसार बहुतेक कॉंग्रेस पक्षाकडे विधानसभेचे जास्त सदस्य आहेत. सगळ्यात जास्त सदस्य त्यांच्याकडे असतील आणि विरोधी पक्षनेते पदाची त्यांची मागणी असेल तर ही मागणी रास्त आहे.
पृथ्वीराज चव्हाण बरोबर
काँग्रेसचे आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे शरद पवार यांच्याबरोबर प्रीतीसंगमापासून यशवंतराव चव्हाण समाधी स्थळापर्यंत होते. शरद पवार आणि चव्हाण यांनी एकत्रितपणे समाधीचे दर्शन घेतले.
ते फडणवीसांना विचारा
पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना सरकारमध्ये सोबत कसे घेतले? या प्रश्नावर पवार म्हणाले, ते फडणवीस यांना विचारा.
आणीबाणीच्या वेळचा संदर्भ आणि अजित पवारांना टोला
अडीच वर्षांपूर्वी जर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत जाऊ शकते तर आम्ही भाजपसोबत जाऊन चूक केलेली नाही, असे अजित पवार यांनी रविवारी म्हटले होते. त्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असताना शरद पवार यांनी आणीबाणीच्या वेळचा महत्वपूर्ण संदर्भ देऊन अजित पवारांना सणसणीत टोला लगावला. ‘‘आणीबाणी जाहीर झाली तेव्हा देशातील अनेक राजकीय पक्ष, माध्यमांनी इंदिरा गांधी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्या काळात इंदिरा गांधी यांची भूमिका योग्य आहे, असे म्हणणारा एकच पक्ष आणि एकच नेता होता. त्या नेत्याचे नाव बाळासाहेब ठाकरे आणि पक्षाचे नाव शिवसेना. त्यानंतर जी निवडणूक झाली त्यात शिवसेना हा एकच पक्ष होता ज्यांनी एकही उमेदवार उभा केला नाही आणि इंदिरा काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. त्यामुळे आता आम्ही शिवसेनेसोबत आहोत हे वेगळे काही करतोय असे नव्हे’’, असे शरद पवार यांनी सांगितले.
साताऱ्यात जोरदार स्वागत
शरद पवारांचे शासकीय विश्रामगृहामध्ये राष्ट्रवादी युवा संघटनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्याची जोरदार आतषबाजी करण्यात आली. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील उपस्थित होते.
खासदार, आमदार शरद पवारांबरोबरच
सातारा, सांगली जिह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी शरद पवार यांच्याबरोबरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, वाई-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील, कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, शिराळाचे आमदार मानसिंगराव नाईक, तासगावच्या आमदार सुमन पाटील, रोहित पाटील, आमदार अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, खासदार वंदना चव्हाण, आमदार अरुण लाड, प्रभाकर देशमुख, दीपक पवार उपस्थित होते.
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दोन्ही बाजूंनी पत्रे गेली आहेत. मात्र या पत्रांमध्ये कोणाकडे किती आमदारांचे संख्याबळ याचा काहीच उल्लेख नसल्याची माहिती नार्वेकर यांनी पत्रकारांना दिली.
पवार काय म्हणाले…
अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे.
तुम्ही चिंता करू नका, पक्षाचा नेता इतका कॉन्फिडंट असेल तर बाकीची सेना रिचार्ज व्हायला वेळ लागत नाही.
जे लोक पक्ष सोडून गेले, त्यांना माझा आशीर्वाद होता असे सांगून काहीजण संभ्रम निर्माण करत आहेत. पण सोडून गेलेले अनेक जण योग्य वेळी निर्णय जाहीर करतील. फक्त त्यांच्याकडे किती, आमच्याकडे किती हे विचारून तुम्ही घाई करू नका.
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात चुकीच्या प्रवृत्ती डोके वर काढत आहेत. महाराष्ट्र आणि देशात जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि फोडाफोडीच्या भाजपच्या प्रवृत्तीला काही लोक बळी पडले. परंतु, या फोडाफोडीचा त्यांना काही फायदा होणार नाही.
साताऱ्याची माती कधीही अन्याय सहन करत नाही. येथील लोक अन्यायाचे बरोबर परिमार्जन करतात. त्यामुळेच मी नव्या लढय़ाची सुरुवात साताऱ्यातून करत आहे. नवीन पिढीने जोमाने काम करावे म्हणून हा दौरा सुरू केला आहे. तरुणांना दिशा दिली आणि कार्यक्रम दिला तर दोन-तीन महिन्यांत राष्ट्रवादी मजबूत होईल.
दिवसभरात काय घडले…
गुरुपौर्णिमेनिमित्त स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करण्यासाठी शरद पवार सकाळी पुण्यातील मोदी बागेतून कराडच्या दिशेने रवाना झाले.
कराडमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचे जोरदार स्वागत केले.
पवार यांच्यासोबत यावेळी माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील उपस्थित होते.
कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पवार सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी रवाना झाले.
शरद पवार यांनी दुपारी सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधला आणि आपल्या नव्या लढाईचे रणशिंग फुंकले.
मुंबईत अजित पवार गटाच्याही जोरबैठका सुरू होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळीच दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहचले. यावेळी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हेसुद्धा तेथे उपस्थित होते.
अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि रूपाली चाकणकर दुपारी सहय़ाद्री अतिथी गृहावर पोहचले.
पवार आणि पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘राष्ट्रवादी’च्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली.
जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करतानाच तटकरे नवे प्रदेशाध्यक्ष असतील असे घोषित करण्यात
जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, असे पत्र रविवारी सकाळीच विधानसभा अध्यक्षांकडे दिल्याची माहिती दिली.