पो. डा. वार्ताहर : सरकार मध्ये डायरेक्ट मंत्री पदासाठी शपथविधी मध्ये शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवारांसह ९ जणांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री उशीरा याबाबतचे पत्र राहुल नार्वेकर यांच्या घरी दिलं होतं. यावर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवारांसह ९ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईला सुरुवात झाली आहे का? असं विचारल्यावर राहुल नार्वेकर यांनी सांगितलं की, “आतापर्यंत माझ्याकडे अनेक निवेदन प्राप्त झाली आहे. त्यात अपात्रतेची याचिका जयंत पाटील यांनी केली आहे. त्याची प्रत रात्री दीड वाजता जितेंद्र आव्हाड यांनी दिली. सर्व निवेदनांवर अभ्यास करून योग्य निर्णय घेऊ.”
बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. याबद्दल विचारल्यावर राहुल नार्वेकर म्हणाले, “विरोधी पक्षाची निवड करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. हा अधिकार बजावताना विधासभेचे काही नियम आहेत. संविधानात काही तरतुदी आहेत. संख्याबळ पाहून योग्य निर्णय घ्यावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहे की विरोधात काम करतोय, याबाबतचा निर्णय घेणं आवश्यक आहे.”
“त्यामुळे विरोधी पक्षाच्या निवडीबद्दलचा निर्णय हा कायदेशीर तरतुदींचा विचार करून योग्यरित्या घेतला जाईल,” असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.