आम नदी काठावरील गावांमध्ये शुक्रवारी गावफेरीचे आयोजन
शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी होणार सहभागी
पो. डा. वार्ताहर , नागपूर : ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत आम नदी काठावरील गावांमध्ये शुक्रवारी प्रदूषणाला रोखण्यासाठी जनजागृतीविषयक गावफेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी 8 ते 10 या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाची जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. यावेळी हा जनजागृतीपर कार्यक्रम निश्चित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, सहायक वनसंरक्षक हरवीर सिंह, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोशन हटवार, राज्यस्तरीय सदस्य प्रवीण महाजन, नाग नदी प्रहरी अरविंद कडबे, प्रद्युम्न सहस्त्रभोजनी आदी यावेळी उपस्थित होते.
आम नदी काठावर सुमारे 20 गावे येतात. या सर्व गावांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह या समितीमधील सदस्य भेटी देणार आहेत. या भेटीदरम्यान आम नदीमध्ये प्रदूषण होऊ नये, यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. या गावांमधील शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी राज्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील ७५ नद्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. या अभियानात नागपूर जिल्ह्यातील नाग आणि आम या दोन नद्यांचा समावेश करण्यात आला आहे.