तेजश्री योजनेतून गोडंबी व्यवसायाला मिळणार गती
वाशिम, दि. 30 (जिमाका) : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव- 2 च्या वतीने अमानी येथील गाव विकास समितीच्या माध्यमातून गोडंबी व्यवसाय करणाऱ्या 66 बचतगटातील महिलांना शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत 10 लक्ष 80 हजार रुपयांचे तेजश्री फायनान्शिअल सर्विसेसच्या माध्यमातून नुकतेच कर्ज उपलब्ध करून देण्यात आले .
नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाच्या माध्यमातून लोकसंचालित साधन केंद्र, मालेगाव-2 ने गोडंबी ट्रेडिंग अँड मार्केटिंगचा उप प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या उप प्रकल्पाच्या माध्यमातून अमानी येथील गोडंबी व्यवसाय करणाऱ्या महिलांना बिबे खरेदी करण्याकरीता तेजश्री फायनान्शिअल सर्विसेसच्या माध्यमातून अल्प व्याजदरातील कर्ज सहाय्य या महिलांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कर्जाचा उपयोग अमानी येथील माविम बचतगटातील महिला बीबे खरेदी करण्यासाठी करीत आहे. त्यामुळे गोडंबी व्यवसायाला चालना व गती प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव- 2 गाव विकास समिती अमानीच्या माध्यमातून महिलांना कर्ज वाटपाचा कार्यक्रम नुकताच माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अमानी गाव विकास समितीच्या रंजना खंडारे हया होत्या. प्रमुख अतिथी म्हणून लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव-2 च्या अध्यक्षा सुनिता गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी व्यवस्थापक प्रा शरद कांबळे, लेखापाल पुष्पा नलगे, डीआयएफ राधिका भोयर, माविम मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गायकवाड, चंद्रभागा माने व सीआरपी वनिता अंभोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी व्यवस्थापक प्रा. शरद कांबळे यांनी लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव- 2 च्या वतीने सुरू असलेल्या नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू असलेल्या गोडंबी ट्रेडिंग व मार्केटिंग उप प्रकल्पाची माहिती उपस्थित महिलांना दिली. महिलांनी कष्टाने तयार केलेल्या गोडंबीला चांगले मार्केट मिळावे याकरीता लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून गोडंबीला पॅकेजिंग व लेबलिंग करून बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. वाशिम येथील राठी मॉल, मालेगाव येथील काही प्रमुख किराणा दुकाने या ठिकाणीसुध्दा गोडंबी विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती दिली.
यावेळी 66 महिलांना 10 लक्ष 80 हजार रुपयाचे कर्ज अल्प व्याजदरामध्ये उपलब्ध करून देण्यात आले. त्याचा महिलांनी स्वतःच्या व्यवसाय उभारणीसाठी उपयोग करावा. महिलांनी उद्योगाबरोबरच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. घरीच परसबाग लागवड करुन सकस आहार घ्यावा. घर दोघांच्या अभियानामध्ये सहभागी व्हावे. स्पार्क प्रकल्पाच्या माध्यमातून दिव्यांगाना बचतगटामध्ये समाविष्ट करून घ्यावे. असे आवाहन देखील श्री. कांबळे यांनी यावेळी उपस्थित महिलांना केले.
यावेळी लेखापाल पुष्पा नलगे, राधिका भोयर व चंद्रभागा माने यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनीता गायकवाड यांनी महिलांना मिळालेल्या कर्जाचा उपयोग उद्योग वाढीसाठीच करावा असे सांगितले. प्रास्ताविक लेखापाल पुष्पा नलगे यांनी केले. संचालन चंद्रभागा माने यांनी केले. उपस्थितांचे आभार वनिता अंभोरे यांनी मानले. कार्यक्रमाला 100 पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या. यावेळी शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत अमानी येथील महिलांना गोडंबी व्यवसायासाठी कर्ज वितरीत करण्यात आल्यामुळे त्यांच्या व्यवसायाला हातभार लागल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.