पो. डा. वार्ताहर चंद्रपूर, : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दि. 1 जुलै ते 15 जुलै 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहे.
या आदेशान्वये संबंधित अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणुका काढता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाहीत. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा कोणत्याही व्यक्तीस, शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे, काट्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करता येईल, अशी इतर कोणतीही वस्तू, कोणताही क्षार, द्रव्ये पदार्थ, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीच्या आकृत्या, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, तसेच यामुळे सभ्यता आणि नीतिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे, त्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात आला आहे.
सदर आदेश 1 जुलै ते 15 जुलै 2023 पर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राकरीता लागू राहील,असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.