विभागीय आयुक्तांकडून शेगाव येथील अतिक्रमणाची पाहणी
पोलीस डायरी प्रतिनिधी,बुलडाणा, : शेगाव येथील अतिक्रमणाची विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय यांनी पाहणी केली. शेगाव येथील पालखीच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली.
शेगाव शहरात दरवर्षीप्रमाणे श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूर येथून आगमन झाले. शेगाव येथे पालखी आल्यावर शहरात श्रींचा पालखी सोहळा उत्सव साजरा करण्यात येतो. त्यानुसार आज दि.११ ऑगस्ट रोजी पोहचली. त्याअनुषंगाने श्री गजानन महाराज मंदिराच्या पालखी सोहळ्याची पूर्वतयारी करण्यात आली. शेगाव गेली दोन दिवस शहरात नगर परिषद कर्मचारी, तसेच पोलीस प्रशासनासमवेत अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबविण्यात आली. शहरातील रेल्वे स्टेशन ते श्री गजानन महाराज मंदिर परिसरामधील अतिक्रमण हटवून शेगावात येणाऱ्या भाविक भक्तांसाठी रस्ता मोकळा करुन देण्यात आला.
तसेच पालखीच्या दिवशी अतिक्रमण होऊ नये यासाठी अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली, तसेच शेगाव शहरातील साफसफाईची कामे जलद गतीने स्वच्छ करण्याची कामे नगर परिषदेमार्फत करण्यात आले.
विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, खामगाव, मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी श्री गजानन महाराज संस्थान सभोवतालच्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर श्री गजानन महाराज संस्थामध्ये असलेल्या पोलिस मदत कक्षाला भेट दिली. यावेळी पालखी मार्गाची पाहणी करण्यात आली.
पाहणीनंतर नगर परिषदेमार्फत गांधी चौक येथे माझी वसुंधरा अंतर्गत आयोजित सार्वजनिक जनजागृती कार्यक्रमाला भेट दिली. जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी श्री गजानन वाटिका येथे वारकरी शिक्षण संस्था येथे जाऊन पालखीचे दर्शन घेतले.